आर्थिक संयम गरिबांनीच का बाळगावा?:आर्थिक संयम कामगार अन् ग्राहकांसाठी ओझे का बनतो? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल
![]()
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रुपयाच्या घसरणीचा थेट लाभ परदेशात डॉलर्सच्या रुपात गुंतवणूक करणाऱ्या देशातील धनदांडग्यांना होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आर्थिक संयमाची परीक्षा गरिबांकडूनच का? तथा आर्थिक संयम कामगार व ग्राहकांसाठी ओझे का बनतो? अशा विविध प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. जागतिक बाजारात सध्या रुपयांची सातत्याने घसरण होत आहे. सध्या एका डॉलर्ससाठी 95.73 रुपये मोजावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी उपरोक्त आरोप केला आहे. ते एका पोस्टमध्ये म्हणाले, एक अत्यंत गंभीर निरीक्षण, आणि त्याहूनही गंभीर प्रश्न! अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मोठे अवमूल्यन झाले आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तू आयात करणे महाग झाले आहे. याचा परिणाम म्हणून महागाई वाढली आहे आणि सर्वसामान्यांसाठी किराणा, इंधन आणि वाहतूक महाग झाली आहे. पण भारतातील श्रीमंत आणि अतिश्रीमंतांच्या बाबतीतही हेच खरे आहे का? डॉलर-मूल्यांकित मालमत्ता आणि स्विस बँकांमधील स्विस फ्रँकमधील भारतीयांच्या पैशांचे मूल्य वाढले आहे. यामुळे त्यांची संपत्ती (कायदेशीर किंवा बेकायदेशीर) वाढली आहे! अलीकडे, अनेक भारतीय कंपन्यांनी परदेशी कंपन्यांमध्ये हिस्सेदारी विकत घेतली आहे किंवा त्यांचे अधिग्रहण केले आहे. त्यांनी आपली मालमत्ता परकीय चलनात ठेवण्याचा पर्याय निवडला आहे. आकडेवारीनुसार, 2025 मध्ये 162 भारतीय कंपन्यांनी परदेशातील कंपन्यांच्या अधिग्रहणावर (outbound acquisitions) 18 अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम खर्च केली. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत 34 टक्क्यांची वाढ दर्शवते. अलीकडेच, ‘सन फार्मा’ने (Sun Pharma) ‘ऑर्गानॉन अँड कंपनी’चे (Organon Co) अधिग्रहण करण्यासाठी, पूर्णपणे रोख स्वरूपातील व्यवहारात 11.75 अब्ज डॉलर्स देण्याचे मान्य केले, असे ते म्हणाले. स्विस बँकांतील डॉलर्सचे मूल्य वाढले प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, रुपयाच्या तुलनेत डॉलर आणि स्विस फ्रँक अधिक बळकट होत असल्याने, श्रीमंत व्यक्तींना आपली संपत्ती डॉलर आणि स्विस फ्रँकमध्ये सुरक्षित ठेवण्याची तसेच ती वाढवण्याची संधी प्राप्त होत आहे. गेल्या 15 वर्षांत, भारतीय रुपयाचे मूल्य स्विस फ्रँकच्या तुलनेत सरासरी दरवर्षी सुमारे 6 टक्क्यांनी घसरले आहे; यामुळे स्विस खात्यांमध्ये असलेल्या परकीय मालमत्तेचे मूल्य, रुपयाच्या संदर्भात पाहता लक्षणीयरीत्या वाढले आहे. जेव्हा – जेव्हा रुपयाचे मूल्य घसरते, तेव्हा त्यांच्या परकीय मालमत्तेचे मूल्य, जे पुन्हा भारतीय रुपयामध्ये रूपांतरित केले जाते, ते आपोआप वाढते. 2024 मध्ये, स्विस बँकांमधील भारतीय निधी तिपटीहून अधिक वाढून सुमारे ₹37,600 कोटींवर पोहोचला. 2026 मध्ये हे प्रमाण कदाचित आणखी वाढू शकेल. माझा अगदी साधा प्रश्न असा आहे की, आर्थिक संयमाची अपेक्षा केवळ मध्यमवर्ग आणि गरिबांकडूनच का केली जाते? हा आर्थिक संयम कामगार आणि ग्राहकांसाठी एक ओझे का बनतो, पण ज्यांची संपत्ती परकीय मालमत्तेच्या माध्यमातून डॉलरशी आणि स्विस बँक खात्यांमधील निधीच्या माध्यमातून स्विस फ्रँकशी जोडलेली आहे, अशा लोकांसाठी मात्र तो एक अनपेक्षित आर्थिक लाभ (windfall) का ठरतो?, असे प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
