हदगाव तालुक्याच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालयात भाजप तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांची मंत्र्यांना भेट
हदगाव तालुक्याच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालयात भाजप तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांची मंत्र्यांना भेट
नांदेड | दि. 27
हदगाव तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, नागरिक तसेच सिंचन व विकासाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी मुंबई येथील मंत्रालयात राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच पालकमंत्री अतुल सावे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, महसूल विभागातील प्रलंबित प्रश्न, शेतकरी बांधवांच्या अडचणी, कृषी व जलसंपदा विभागाशी संबंधित विविध कामे तसेच स्थानिक विकासाला गती देण्यासाठी आवश्यक बाबींवर मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
तालुक्यातील जनहिताचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी आग्रही मागणी भागवत देवसरकर यांनी यावेळी केली. संबंधित मागण्यांचे सविस्तर निवेदनही मंत्रीमहोदयांना सुपूर्द करण्यात आले.
या भेटीदरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री अतुल सावे यांनी हदगाव तालुक्यातील विविध मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित विभागामार्फत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती भागवत देवसरकर यांनी दिली.
या महत्त्वपूर्ण भेटीमुळे हदगाव तालुक्यातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे परमेश्वर काळे, कैलास चव्हाण, दीपक पटणे आदी उपस्थित होते.
