मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात चोरी:चोरट्यांचा 80 हजारांवर डल्ला; मंत्र्याच्या दालनातच चोरी झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ
![]()
मंत्रालय हे राज्यातील सर्वात सुरक्षित ठिकाणांपैकी एक मानले जाते. त्यामुळे तिथे चोरी होणे ही जवळपास अशक्यप्राय बाब समजली जाते. मात्र, हा समज खोटा ठरवणारी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या दालनातच चोरट्यांनी हात साफ करत तब्बल 80 हजार रुपयांवर डल्ला मारल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, शिवसेना नेते तथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून तब्बल 80 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. ही बाब लक्षात येताच कार्यालयात एकच धावपळ उडाली. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही. पण ही चोरी झाली कशी? याचा कसून तपास केला जात आहे. मंत्रालय त्यातही मंत्र्यांच्या दालनात जनतेचा नेहमीच राबता असतो. पण सहसा चोरीची घटना घडत नाही. कारण, येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मोठे जाळे व चोख पोलिस बंदोबस्त असतो. त्यामुळे ही घटना घडलीच कशी? यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे मंत्रालयात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्याला आपल्यासोबत 10 हजारांहून अधिकची रक्कम घेऊन येता येत नाही. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच तपासणीवेळी संबंधितांना तशा सूचना दिल्या जातात. असे असताना मंत्री संजय राठोड यांच्या शासकीय कार्यालयात 80 हजार रुपयांची रोकड आली कुठून? व ती तिथे का ठेवण्यात आली होती? असे विविध प्रश्नही या प्रकरणी उपस्थित केले जात आहेत. मंत्रालयात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात उभे असलेले मंत्रालय हे महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचे मुख्य केंद्र मानले जाते. मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ आयएएस अधिकारी तसेच विविध विभागांची महत्त्वाची कार्यालये याच इमारतीत कार्यरत आहेत. दररोज हजारो नागरिक, कर्मचारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मंत्रालयात ये-जा करत असतात. त्यामुळे संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली असते. प्रवेशद्वारांवर पोलिसांचा बंदोबस्त, ओळखपत्रांची तपासणी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे आणि प्रत्येक मजल्यावर सुरक्षा कर्मचारी अशी बहुस्तरीय सुरक्षा मंत्रालयात कायम ठेवली जाते. मंत्रालय परिसर हा नेहमीच अतिसंवेदनशील आणि व्हीआयपी हालचालींमुळे चर्चेत असणारा भाग मानला जातो. मंत्रालयासमोरच पोलीस बंदोबस्त, बॅरिकेड्स आणि वाहन तपासणीची व्यवस्था असते. याशिवाय, मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवली जाते. अशा ठिकाणी थेट मंत्र्यांच्या दालनात चोरीची घटना घडल्याने केवळ प्रशासनच नव्हे, तर सुरक्षा यंत्रणांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
