मोफत धान्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक:अडीच लाखांचा ऐवज लांबवून चोरटे पसार; पुण्यातील घटना

0
a60a271f-37aa-472b-8c06-e7816c40fbde_1779791309590.jpg




विमाननगर भागात मोफत धान्य आणि रोख रक्कम देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ फळविक्रेत्या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. चोरट्यांनी महिलेकडील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला विमाननगर परिसरात फळ विक्री करतात. दोन चोरटे त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी एका श्रीमंत महिलेकडून ज्येष्ठ महिलांना साडी, धान्य वाटप केले जाणार असल्याची बतावणी केली. तसेच गरजू महिलांना दहा हजार रुपये रोख स्वरूपात दिले जातील, असेही सांगितले. या आमिषाला बळी पडून महिलेने चोरट्यांवर विश्वास ठेवला. चोरट्यांनी महिलेला अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. महिलेला बोलण्यात गुंतवून तिचे लक्ष विचलित केले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी पिशवीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम काढून त्याऐवजी वेफर्सचे पुडे ठेवले आणि पसार झाले. पिशवी उघडून पाहिल्यावर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पिशवीत दागिने नसून वेफर्सचे पुडे पाहून तिला धक्का बसला. त्यानंतर महिलेने तात्काळ विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक गाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. मोफत धान्य किंवा साडी वाटपाचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलांकडून दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारची बतावणी करणारे संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *