सावंतवाडी स्टेशनला मधु दंडवते यांचे नाव, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय:कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनाही मुदतवाढ; कोकण, नागपूर, डोंबिवलीसाठी महत्त्वाच्या घोषणा

0
730-x-548-new-2026-05-26t084429857_1779784396.jpg




राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षामार्फत याबाबत माहिती देण्यात आली. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याचा मोठा निर्णय यावेळी घेण्यात आला. मंत्रिमंडळाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस, असे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. कोकणातील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून ही मागणी सातत्याने केली जात होती. आता राज्य सरकारने या मागणीला हिरवा कंदील दिला असून नामांतराचा अंतिम प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. हा निर्णय परिवहन विभागामार्फत मंजूर करण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ बैठकीत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये अनेक विभागांमध्ये निर्माण झालेल्या अडचणी आणि प्रशासकीय कारणांमुळे ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. डोंबिवली परिसरातील धार्मिक संस्थेसाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कल्याण तालुक्यातील मौजे सागाव सोनारपाडा परिसरातील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही जमीन डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये येत असून संबंधित ट्रस्टकडून त्या जागेचा वापर सुरू होता. आता हा वापर नियमित करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तसेच ही जमीन नाममात्र दरात ट्रस्टच्या नावावर देण्यालाही मान्यता देण्यात आली आहे. उद्योग विभागाच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला होता. या निर्णयामुळे मंदिर ट्रस्टच्या विकासकामांना वेग मिळणार असल्याची चर्चा आहे. नागपूरमधील महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांसाठीही मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. नवीन नागपूर आणि नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी लागणाऱ्या खासगी जमिनींच्या खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. हिंगणा तालुक्यातील मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) येथील जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी करण्यात येणार आहे. या व्यवहारामुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक भार येऊ नये आणि प्रकल्पाला गती मिळावी यासाठी शुल्कमाफीचा निर्णय घेण्यात आला. महसूल व मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. फडणवीस मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय देखील वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed