इंधन टंचाई 'आपत्ती' म्हणून जाहीर करा:शरद पवार गटाची मागणी; शेतकऱ्यांसाठी इंधनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचाही सल्ला

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-26t12_1779779163.jpg




खरीप हंगामाची कामे आणि पेरणीची पूर्वतयारी ऐन रंगात आली असतानाच, राज्यातील शेतकरी बांधव डिझेल आणि पेट्रोलच्या तीव्र टंचाईमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीवर काँग्रेस नेते अमित देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन व सरकारचे लक्ष वेधले आहे. अमित देशमुख यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे पत्र पाठवून ट्रॅक्टर व शेती अवजारांसाठी शेतकऱ्यांना कॅन किंवा बॅरलमध्ये सुलभतेने इंधन पुरवठा करण्याची आणि गरज पडल्यास स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, रोहिणी खडसे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून ही इंधन टंचाई ‘आपत्ती’ म्हणून जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर 30 टक्के डिझेल साठा शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यासह तालुकानिहाय 24 तास ‘शेतकरी डिझेल मदत कक्ष’ सुरू करण्याची आग्रही विनंती त्यांनी केली आहे. इंधनाअभावी एकाही शेतकऱ्याची शेतीची कामे रखडू नयेत, अशी एकमुखी मागणी या दोन्ही नेत्यांनी केली आहे. देशमुखांचे लातूर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे पत्र काँग्रेस नेते अमित देशमुख म्हणाले की, इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर, इंधनाअभावी शेतकऱ्यांची शेती माशागतीची कामे थांबू नयेत, त्यांना सुलभतेने पेट्रोल व डिझेल या इंधनाचा पुरवठा व्हावा, गरज पडल्यास शेतकऱ्यांना इंधन पुरवठा करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी आज लातूर जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र पाठवून केली आहे. शेतीची कामे सुरू काँग्रेस नेते अमित देशमुख म्हणाले की, सध्या शेतकरी बांधवाकडून खरीप हंगामाच्या तयारीची तसेच ऊस व बागायती शेतीच्या मशागतीची कामे सुरु आहेत. शेती मशागतीच्या या कामासाठी ट्रॅक्टर तसेच ईतर वाहनांचा व तांत्रीक अवजारांचा वापर करण्यात येतो आहे. यासाठी पेट्रोल/डिझेलची या इंधनाची नितांत आवश्यकता भासते आहे.
काँग्रेस नेते अमित देशमुख म्हणाले की, इंधन टंचाईची सर्वत्र चर्चा सुरु असताना अनेक पेट्रोल पंपावर गाड्यांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी शेती मशागतीच्या यंत्रासाठी लागणारे पेट्रोल/डिझेल घेऊन जाण्यासाठी शेतकरी कॅन / बॅरल घेऊन येत आहेत. या शेतक्य­यांना काही पेट्रोल पंपावर इंधन नाकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. इंधन पुरवठ्यात अडचणी येत असल्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल/डिझेलची टंचाई भासत आहे ही वस्तुस्थिती आहे. हे जरी खरे असले तरी सद्यस्थितीत शेतीची कामेही होणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतक­ऱ्यांनाही शेती कामासाठी इंधन उपलब्ध होणे आवश्यक आहे. पेट्रोल-डिझेल द्या.. काँग्रेस नेते अमित देशमुख म्हणाले की, शेतक­ऱ्यांची समस्या, अडचण आणि त्यांची गरज लक्षात घेऊन, त्यांना सुलभ पद्धतीने आवश्यकतेनुसार पेट्रोल/डिझेल उपलब्ध करुन देण्यासंदर्भात लातूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप धारकांना आपल्या स्तरावरुन सुचना देण्यात याव्यात. शेती कामासाठी इंधन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात वेगळी व्यवस्था निर्माण करता येते का हेही पहावे. एकाही शेतक­ऱ्याचे शेती कामे इंधनाअभावी रखडली जाऊ नयेत याची दक्षता घ्यावी, अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे. डिझेल टंचाई ही ‘आपत्ती’ जाहीर करा- रोहिणी खडसे
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे म्हणाल्या की, पावसाळा तोंडावर असल्याने शेतकरी बांधव पेरणीच्या तयारीला लागले आहेत. पेरणीसाठी ट्रॅक्टर, पंप, मशागतीचे यंत्र आणि इतर अवजारांसाठी डिझेल हे महत्त्वाचे आहे. पण सध्या डिझेलची दरवाढ, डिझेलच्या साठ्याबाबतचा संभ्रम, यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण होत आहे. या गंभीर विषयावर देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, यांचं लक्ष वेधण्यासाठी पत्र लिहिले आहे तसेच काही उपाययोजना सुचविल्या आहेत. 1) ऐन शेती हंगामात निर्माण झालेली डिझेल टंचाई ही “आपत्ती” म्हणून जाहीर करण्यात यावी. 2) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयांतर्गत “शेतकरी डिझेल मदत कक्ष” तातडीने स्थापन करण्यात यावा ज्याने करून शेतकऱ्यांना प्रशासनाशी संवाद साधता येईल. 3) डिझेल टंचाई पूर्णपणे निवारण होईपर्यंत हा मदत कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात यावा. 4) तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवरील डिझेल साठ्याची माहिती दर तासाला सोशल मीडियाद्वारे व मदत कक्षामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. 5) प्रत्येक पेट्रोल पंपावरील किमान 30 टक्के डिझेल साठा शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात यावा. 6) डिझेल भरण्यासाठी ट्रॅक्टर किंवा वाहन प्रत्यक्ष पंपावर आणण्याची सक्ती करू नये. शेतकऱ्यांनी आणलेल्या सुरक्षित कॅन, ड्रम किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यास परवानगी द्यावी. शासनाने या सुचनांचा विचार करून अंमलबजावणी करावी ही अपेक्षा! असे रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed