इंधन दरवाढीविरोधात पुणे काँग्रेसचे आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध

0
df5afcaf-376b-4352-94dc-aa1420e48162_1779781254800.jpg




देशात सातत्याने होणारी इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं केली. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने सामान्य पुणेकर नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडण्यात आला. काँग्रेस नेत्यांनी यावेळी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्ता मिळवल्यानंतर सरकारने केवळ बड्या उद्योगपतींचे खिसे भरले आणि सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही, त्याचा फायदा जनतेला न देता, युद्धाचे निमित्त करून इंधन दरवाढीचा बोजा लादला जात असल्याचा संताप आंदोलकांनी व्यक्त केला. या चुकीच्या धोरणांमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबं आर्थिक संकटात सापडली आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप , दिप्ती चवधरी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पुणे महानगरपालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम, नगरसेविका दिपाली डोख, मजहर मणियार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे आणि पप्पू घोलप यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या हुकूमशाही आणि भांडवलदारधार्जिण्या धोरणांमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. सरकारने ही इंधन दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पुणे शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed