एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास, पुणे महोत्सवात मत

0
f0e9dbd5-9e4a-4e30-856e-efc77f71ce0f_1779723889690.jpg




ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. रंगभूमी हा जिवंत आणि उत्स्फूर्त आविष्कार असल्याने एआय त्याला पर्याय ठरू शकणार नाही, असे मत त्यांनी मांडले. रावल म्हणाले की, रंगभूमीवरील उर्जेची सळसळ एआय आणू शकत नाही. तर, अनेक प्रलोभने असूनही रंगभूमीवरील प्रयोग हाऊसफुल होत असल्याचे निरीक्षण नसिरुद्दीन शाह यांनी नोंदवले. ते पुणे येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष एस. पी कुलकर्णी, नाट्य महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे, आनंद लागू, डाॅ. मोहन आगाशे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. स्पर्धात्मक उपक्रमांतूनच स्वतःमधील अभिनयाची आवड लक्षात आल्याचे दोघांनीही सांगितले. नसिरुद्दीन शाह यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील (एनएसडी) अनुभवकथन केले. ते म्हणाले की, नट प्रशिक्षित नसला तरी चालेल, पण तो शिक्षित असलाच पाहिजे. शेक्सपिअरची नाटके वर्गात शिकताना झोप येत असे, पण तीच रंगभूमीवर बघताना वेगळीच जादू घडत असे. चित्रपटांनीही माझ्यावर अशीच जादू केली. परेशच्या अभिनयानेही मी प्रभावित झालो होतो. प्रशिक्षण आणि शिक्षण यात फरक आहे, हे मला एनएसडी आणि एफटीआयआयमुळे समजले. पुण्यात एफटीआयआयमध्ये आल्यावर मला नट म्हणून शिक्षित होण्याची दिशा मिळाली, असे शाह यांनी सांगितले. परेश रावल यांनी इंटरक्लास स्पर्धेच्या निमित्ताने अभिनय करताना वाट सापडल्याचा उल्लेख केला. गुजराती रंगभूमीवर प्रयोग होत असत, पण त्यात बारकावे नसायचे. मराठी रंगभूमी मात्र सुरुवातीपासून समृद्ध होती आणि आजही आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. एनएसडीचे नावही मला ठाऊक नव्हते आणि मी या संस्थेचा अध्यक्षही झालो, असा गमतीदार उल्लेख रावल यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *