पुण्यातील खाऊगल्ल्या रात्री 10 वाजता बंद:सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्तांचा निर्णय
![]()
पुण्यातील खाऊगल्ल्या आता रात्री १० वाजता बंद केल्या जाणार आहेत. सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. पदपथ आणि रस्त्यावरील हातगाड्या, स्टॉल तसेच ठेले यांना रात्री १० वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची कायदेशीर परवानगी आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या रात्री १२ ते १ वाजेपर्यंत सुरू असतात. यामुळे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व खाऊगल्ल्या रात्री १० वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील आठवड्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रात्रीच्या वेळी शहरात विविध ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली. त्यावेळी त्यांना अनेक खाऊगल्ल्या रात्री उशिरापर्यंत उघड्या दिसल्या आणि तिथे अनियंत्रित गर्दीही होती. या पाहणीनंतर आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना खाऊगल्ल्या रात्री १० वाजता बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी खाऊगल्ल्यांबरोबरच हॉटेल आणि दुकान व्यावसायिकांनाही रात्री १० वाजता व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले. गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरात हा प्रकार सुरू होता, ज्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हॉटेल व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदनही दिले होते. यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “आम्ही आस्थापनांना बंद करत नाही. त्यांना असलेल्या परवानगीनुसार त्या सुरूच राहतील. मात्र, आस्थापना जर पदपथावर किंवा दुकानाबाहेर टेबल टाकून व्यवसाय करत असतील, तर त्या बंद केल्या जातील. नियमानुसार आस्थापनांनी दुकानाच्या आतच व्यवसाय करायचा आहे.” हॉटेल, पब, रेस्टॉरंट आणि बार यांना कायद्याने दिलेल्या वेळेनुसार सुरू राहण्याची परवानगी असेल, असेही त्यांनी नमूद केले.
