हनकदरी शिवारात उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू:सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद, जिल्ह्यातील चौथा बळी
![]()
सेनगाव तालुक्यातील हनकदरी शिवारात उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. २४ रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उष्णतेमुळे जिल्ह्यातील चौथा बळी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील हनकदरी येथील उकंडी उर्फ संतोष गोपाल धाबे (४८) हे शनिवारी ता. २३ कामा निमित्त घरातून बाहेर पडले होते. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत ते घरी आले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. रविवारी ता. २४ काही मुले पोहण्यासाठी जात असतांना उकंडी उर्फ संतोष यांचा मृतदेह हनकदरी शिवारातील एका झाडाखाली दिसून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार जीवन मस्के, जैस्वाल, सुभाष चव्हाण यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला होता. उत्तरीय तपासणीच्या अहवालात उकंडी उर्फ संतोष यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे नमुद केले आहे. या प्रकरणी भिकाजी धाबे यांच्या माहितीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार जीवन मस्के पुढील तपास करीत आहेत. मयत उकंडी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हिंगोली जिल्हयात उष्माघाताचा हा चौथा बळी आहे. जिल्हयात मागील काही दिवसांत उष्णतेचा पारा चांगलाच वाढू लागला असून सकाळी दहा नंतरच वातावरण गरम होऊ लागले आहे. जिल्हयाचे तापमान ४२ ते ४३ अंशापर्यंत पोहोचले आहे.
