बॉडी बिल्डिंग औषधांची बेकायदा विक्री, एक जण अटकेत:हडपसरमधून ‘मेफेनटर्मिन सल्फेट’ इंजेक्शनच्या ८२ बाटल्या जप्त
![]()
हडपसर परिसरातून बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ‘मेफेनटर्मिन सल्फेट’ इंजेक्शनच्या ८२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अभिषेक खंडू भंडुडे (वय २५, रा. हिंगणेमळा, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आर्थिक फायद्यासाठी तो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि वैद्यकीय देखरेखीशिवाय वापरणे आवश्यक असलेल्या या औषधाची बेकायदा विक्री करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार नितीन मारुती मुंढे यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर परिसरात एक तरुण कोणतीही वैध परवानगी नसताना इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खंडणीविरोधी पथक-२ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ‘मेफेनटर्मिन सल्फेट’ इंजेक्शनच्या एकूण ८२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. प्राथमिक तपासात आरोपीकडे औषध विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले आहे. तसेच अशा प्रकारच्या औषधांच्या विक्री व वापराबाबत त्याला कोणतेही अधिकृत प्रशिक्षणही मिळाले नव्हते. तरीदेखील तो नागरिकांना ही इंजेक्शने विकत होता. ‘मेफेनटर्मिन सल्फेट’ असे या औषधाचे नाव आहे. १२ ते ३० वयोगटातील मुले व तरुणांकडून कमी वेळात आकर्षक शरीरयष्टी (बॉडी) तयार करण्यासाठी याचा गैरवापर केला जातो. इंजेक्शन दिल्यानंतर व्यक्तीला ताजेतवाने आणि उत्साही वाटते, जिममध्ये वर्कआउट करताना थकवा येत नाही आणि झोप लागत नाही, असे वापरकर्ते सांगतात. मेफेनटर्मिन हे औषध हृदयाला उत्तेजित करते आणि शस्त्रक्रियेदरम्यान कमी झालेला रक्तदाब वाढण्यास मदत करते. हे औषध वैद्यकीय उपयोगासाठी आहे, बॉडी बिल्डिंगसाठी नाही. सातत्याने घेतल्यास शरीरात ऑक्सिजनची मागणी वाढते आणि स्नायूंची ताकद तात्पुरती वाढण्यास मदत होते. मात्र, हा तात्पुरता परिणाम असतो. वारंवार घेतल्याने त्याची सवय लागते आणि मेंदूतील पेशींना ते हवेसे वाटू लागते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या औषधाचे संभाव्य दुष्परिणाम माहिती असूनही आरोपीने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत विक्री सुरू ठेवली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुरव करत आहेत.
