'शांत मन – द सीक्रेट ऑफ लाईफ' पुस्तकाचे प्रकाशन:मनाची शांती समजण्यासाठी नैसर्गिक नाते गरजेचे – डॉ. संप्रसाद विनोद

0
0ac6e67a-2c1c-497c-8379-689d0e03f57a_1779702349054.jpg




आत्मयोगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांनी ‘मनाची शांती समजून घेण्यासाठी त्याच्याबरोबर नैसर्गिक नाते निर्माण करण्याची गरज’ असल्याचे मत व्यक्त केले. लेखक कौस्तुभ साबळे यांच्या ‘शांत मन – द सिक्रेट ऑफ लाईफ’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. आयुष प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, प्रसिद्ध नाटककार डॉ. चंद्रशेखर फणसळकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य, डॉ. निरंजन ढेकणे आणि डॉ. धनंजय बोडस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. विनोद पुढे म्हणाले की, आपल्यामध्ये असणाऱ्या ‘मी’ चे दर्शन घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्यातील अस्तित्वाची जाणीव होते. आपल्यातील चैतन्य हेच जीवनाचे खरे रहस्य आहे आणि प्रत्येकाने त्याची अनुभूती घेतली पाहिजे. स्वतःला सर्व बाजूंनी समजून घेतल्यास सर्वसमावेशक दृष्टी प्राप्त होते. यावेळी डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांनी सांगितले की, आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांची सकारात्मक कथा आपण रचल्यास मनाचे आरोग्य उत्तम राखण्यास निश्चितपणे मदत होते. मनातील घटनांचे प्रतिबिंब आपल्या मनावर परिणाम करत असल्याने मनाच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. डॉ. सदानंद बोरसे यांनी नमूद केले की, मनाला शांत ठेवणे ही एक अवघड प्रक्रिया आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांचा मनावर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने मनाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य म्हणाले की, मनाचे आरोग्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. अलीकडच्या काळात वाढलेले ताणतणाव आणि वेळेच्या व्यवस्थापनात मनाचे आरोग्य उत्तम राखणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *