पेसा शिक्षकांची जि.प.वर धडक, कायम नियुक्तीची मागणी:आमदार तायडे यांचा मुद्दा, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा
![]()
अमरावती: मेळघाटात ‘पेसा’ अंतर्गत सेवा दिलेल्या शिक्षकांना आगामी सत्रासाठी रुजू करून न घेता, त्या जागांसाठी नव्याने प्रक्रिया राबवली जात आहे. याविरोधात जुन्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, त्यांनाच पुनर्नियुक्ती मिळावी या मागणीसाठी २५ मे रोजी त्यांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. या शिक्षकांनी गेल्या काही वर्षांपासून मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सेवा दिली आहे. त्यांना त्या भागातील नागरिकांची स्थानिक भाषा अवगत असून, स्थानिकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. दीडशेहून अधिक असलेल्या या शिक्षकांपैकी बहुतेक जण त्याच भागातील रहिवासी असल्याने, स्थानिक भाषेत उत्कृष्टपणे विद्यादान करण्यासाठी त्यांचा थेट फायदा होतो, असे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे. अचलपूर-चांदूरबाजारचे आमदार प्रवीण तायडे यांनी या शिक्षकांची बाजू उचलून धरली. त्यांनी प्रभारी सीईओ विनय ठमके आणि शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांना निवेदन सादर केले. आमदार तायडे यांनी प्रभारी सीईओ विनय ठमके यांच्या दालनात शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांच्यासोबत या शिक्षकांच्या मागण्यांवर चर्चा केली. सदर शिक्षकांनाच पुनर्नियुक्ती दिल्यास मेळघाटचे शिक्षण अधिक सक्षम व चोखपणे पुढे नेता येईल, असे आमदार तायडे यांनी अधोरेखित केले. त्यामुळे नव्याने भरती प्रक्रिया राबवताना जुन्या शिक्षकांनाच प्राधान्य द्यावे, असा त्यांचा आग्रह आहे. यावेळी शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून निलेश बोरकर, रितू गायधने, सोनल चौधरी, राहुल उपासे, ऋषिकेश डवरे, वैभव चौधरी आणि संदीप देशकर आदी उपस्थित होते. मेळघाटसाठी राज्य शासन नेहमी नवनवीन प्रयोग करत असते. ज्या शिक्षकांनी गेल्या काही वर्षांत आपल्या कौशल्याने विद्यार्थ्यांना आपलेसे केले आहे आणि त्यावेळी शासनाने आखून दिलेले निकष पूर्ण केले आहेत, त्यांनाच अधिक प्रभावीपणे शिकवता येते. अशा अनुभवी शिक्षकांना प्राधान्य दिल्यास मेळघाटमधील शिक्षणाची गुणवत्ता टिकून राहील.
