Ambenali Ghat Accident | आंबेनळी कार अपघातात धक्कादायक ट्विस्ट; 24 तास दरीत पडली होती स्कॉर्पिओ, कुणालाच भनकही नव्हती!

0
sayali-web-2026-05-25T173426.960.webp.webp


Ambenali Ghat Accident | रायगड (Raigad) जिल्ह्यातील आंबेनळी घाटात (Ambenali Ghat) एक स्कॉर्पिओ कार तब्बल १२०० फूट खोल दरीत कोसळून आठ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. दाभिळ टोक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धोकादायक वळणावर हा थरार घडला. विशेष म्हणजे, हा अपघात शनिवारी रात्रीच्या अंधारात झाला होता, मात्र उंचावरून कोसळलेली गाडी कोणाच्याही दृष्टीस पडली नाही. तब्बल २४ तास उलटून गेल्यानंतरही स्थानिक पोलीस प्रशासनाला या दुर्घटनेचा सुगावा लागला नव्हता, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काळजाचा थरकाप उडवणारा २४ तासांचा शोध प्रवास

शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली असली, तरी रविवारी संपूर्ण दिवस उलटूनही तरुणांचा कोणताही पत्ता नव्हता. घरी न परतलेल्या मुलांच्या चिंतेपोटी कुटुंबीयांनी रविवारी सकाळपासूनच त्यांची चौकशी सुरू केली होती. अखेर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही कार खोल दरीत कोसळल्याचे निष्पन्न झाले. या अपघातात मृत्युमुखी पडलेले आठ पैकी पाच तरुण हे सातारा (Satara) जिल्ह्यातील आसगाव येथील रहिवासी होते. हे सर्वजण एकाच परिसरात राहणारे आणि लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते, जे एकत्र पर्यटनासाठी बाहेर पडले होते.

मृतांपैकी एक असलेल्या रितेश लोखंडे याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण शुक्रवारी रात्री साताऱ्यातून निघाले आणि शनिवारी पहाटे हर्णे येथे पोहोचले. तिथे त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर आनंद लुटला आणि त्याचे फोटोही समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. शनिवारी संध्याकाळी रितेशने वडिलांना फोन करून रात्री १० वाजता जेवण करून साताऱ्याकडे निघणार असल्याचे सांगितले होते. रविवारी सकाळी रितेश घरी न आल्याने अजिंक्यतारा रुग्णालयात (Ajinkyatara Hospital) सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या त्याच्या वडिलांनी त्याला जवळपास ५० ते ६० वेळा फोन केला. फोनची रिंग वाजत होती, पण प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांत धाव घेत मुलांचे मोबाईल लोकेशन तपासण्यात आले.

मोबाईल लोकेशन आणि ट्रेकर्सच्या मदतीने लागला शोध

पोलिसांनी तांत्रिक तपास करत तरुणांच्या मोबाईलचे अंतिम लोकेशन पोलादपूर (Poladpur) आणि आंबेनळी घाट परिसरात शोधून काढले. यावरूनच गाडी दरीत कोसळल्याचा संशय बळावला. त्यानंतर तातडीने स्थानिक ट्रेकर्सच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सुरुवातीला तपास करताना दरीत एक जुनी अपघातग्रस्त कार आढळून आली. मात्र, अधिक सखोल शोध घेतल्यानंतर उंचावरून कोसळलेली ती स्कॉर्पिओ कार पोलिसांना दिसून आली.

रात्रीच्या वेळी प्रचंड अंधार आणि दरीची खोली जास्त असल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्याच्या कामात अडथळे येत होते. त्यामुळे सोमवारी सकाळी ट्रेकर्सनी जीवाची बाजी लावून दोऱ्या आणि स्ट्रेचरच्या साहाय्याने सर्व आठ मृतदेह दरीतून यशस्वीरित्या बाहेर काढले. या दुर्घटनेमुळे आसगाव परिसरासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

News Title: Ambenali Ghat Accident Scorpio Crash 8 Dead Found After 24Hrs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed