बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, 70 लाखांची फसवणूक उघड:पुणे पोलिसांनी गुजरातमध्ये दोघांना केली अटक

0
62d670eb-f660-4f73-a331-044713aafc7c_1779725586159.jpg




पुणे पोलिसांनी एका मोठ्या फसवणूक टोळीचा पर्दाफाश केला आहे. परदेशी कॉल सेंटरसाठी प्रकल्प आणि सेटअप उभारून देण्याचे आमिष दाखवून या टोळीने तब्बल ७० लाख ८५ हजार ४५३ रुपयांची फसवणूक केली होती. पुणे पोलिसांच्या तपास पथकाने गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात छापा टाकून एका बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीशी ‘सीट्रीक्स प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कन्सल्टंट एलएलसी, दुबई’ या बनावट कंपनीचे नाव वापरून संपर्क साधला. ते दुबईतून बोलत असल्याचा बहाणा करत, परदेशी कॉल सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक प्रकल्प आणि सेटअप मिळवून देण्याचे आमिष त्यांनी फिर्यादीला दाखवले. यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने ७० लाख ८५ हजार ४५३ रुपये उकळले. मात्र, एवढी मोठी रक्कम घेऊनही कोणताही प्रकल्प न देता त्यांनी फिर्यादीची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पुणे शहरातील खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक केल्यानंतर आरोपींनी ‘प्रमोटअप एचआर सोल्यूशन’ या नावाने एक अनधिकृत कंपनी स्थापन केली आणि आपले कामकाज अहमदाबाद, गुजरात येथे हलवले होते. खराडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपींचे ठिकाण शोधून काढले. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ७) सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुजरात गाठले. अहमदाबाद येथील बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी खुशी कौशल परमार उर्फ सान्वी शहा (रा. राजकोट, गुजरात) आणि तुषार महेशकुमार तलपाडा (रा. अहमदाबाद, गुजरात) या दोन आरोपींना अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून कॉम्प्युटर सीपीयू, लॅपटॉप, मोबाईल फोन, सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन आणि बनावट दुबईस्थित कंपनीच्या संभाषणाचे स्क्रिप्ट्स (कागदपत्रे) असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील आणि पोलीस उप आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशनच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed