SBI Bank Holiday | SBI ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ६ दिवस बँका बंद राहणार
SBI Bank Holiday | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) अर्थात एसबीआय (SBI) च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 23 मे 2026 पासून सलग सहा दिवस बँकेच्या शाखा बंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शाखेत जाऊन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल सेवा सुरू राहणार असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
23 आणि 24 मे रोजी अनुक्रमे शनिवार आणि रविवार असल्यामुळे एसबीआय (SBI) च्या शाखा बंद राहतील. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते, त्यामुळे या दोन दिवसांमध्ये नियमित शाखा सेवा उपलब्ध राहणार नाहीत. त्यानंतर 25 आणि 26 मे रोजी एसबीआय स्टाफ फेडरेशनने (SBI Staff Federation) संपाची घोषणा केली आहे.
या संपामागे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (National Pension System) म्हणजेच एनपीएस (NPS) फंड मॅनेजर्सच्या भरतीसह विविध कर्मचारी विषयक मुद्दे असल्याचे सांगितले जात आहे. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन (All India State Bank of India Staff Federation) या संघटनेने जॉब आऊटसोर्सिंग, वेतन आणि भत्त्यांमधील असमानता, करिअर प्रगती योजना तसेच एचआरएमएस (HRMS) संबंधित अडचणींबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला आहे.
SBI Bank Holiday | बकरी ईदमुळे आणखी सुट्ट्या :
27 आणि 28 मे रोजी बकरी ईद (Bakri Eid) निमित्त देशातील विविध राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) म्हणजेच आरबीआयने (RBI) या सणासाठी वेगवेगळ्या तारखांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. देशातील बहुतांश भागांमध्ये 27 मे रोजी बँका बंद राहतील, तर काही राज्यांमध्ये 28 मे रोजीही बँक व्यवहार ठप्प राहतील.
विशेषतः जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) या केंद्रशासित प्रदेशात 27 आणि 28 मे दोन्ही दिवशी बकरी ईदनिमित्त बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे अनेक भागांमध्ये सलग सहा दिवस शाखा सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी याचा विचार करून महत्त्वाची बँकिंग कामे आधीच पूर्ण करून ठेवावीत, असा सल्ला दिला जात आहे.
दरम्यान, एसबीआय (SBI) कडून ऑनलाइन सेवा नियमित सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय (UPI) व्यवहार आणि एटीएम (ATM) सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. त्यामुळे डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
