Uniform Civil Code | दोन लग्न केल्यास 7 वर्षांची शिक्षा होणार! ‘या’ राज्याचा मोठा निर्णय
Uniform Civil Code | आसाम (Assam) विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक (Uniform Civil Code Bill) मंजूर करण्यात आले असून राज्यात विवाह, घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप आणि वारस हक्काशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. या नवीन कायद्यामुळे सर्व धर्मांसाठी समान नियम लागू करण्यात येणार असून अनेक बाबींमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे विधेयक मंजूर केले आहे. या कायद्यानुसार कोणत्याही धर्मातील व्यक्तीला एकापेक्षा अधिक विवाह करता येणार नाहीत. जर एखाद्या व्यक्तीने दोन किंवा त्यापेक्षा जास्त विवाह केल्याचे आढळून आले तर त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
याशिवाय विवाह किंवा घटस्फोटाची नोंद 60 दिवसांच्या आत संबंधित सरकारी कार्यालयात करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक नोंदणी केली नाही, तर अशा व्यक्तीवर 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तसेच पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय 21 वर्षे आणि महिलांसाठी 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या वयोमर्यादेपेक्षा कमी वयात विवाह करता येणार नाही.
Uniform Civil Code | लिव्ह इन रिलेशनशिपसाठीही नियम :
या कायद्यानुसार लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी करणे देखील आवश्यक असणार आहे. जर संबंधित जोडप्याने नोंदणी केली नाही तर तीन महिन्यांपर्यंत कारावास किंवा 10 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक संबंधांबाबतही राज्य सरकारने स्पष्ट नियम लागू केले आहेत.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अल्पसंख्याक समाजातील महिलांना न्याय आणि संरक्षण मिळावे या उद्देशाने हे विधेयक आणल्याचे सांगितले आहे. मात्र ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यासह अनेक मुस्लिम नेत्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. मुस्लिम समाजावर हिंदू कायदे लादण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, या कायद्याच्या कक्षेबाहेर अनुसूचित जमातींना ठेवण्यात आले आहे.
