युवक काँग्रेसची 'आवाज महाराष्ट्राचा' मोहीम:अमरावतीतील प्रलंबित समस्यांवर आक्रमक भूमिका
![]()
अमरावती शहरातील नागरी समस्या, रखडलेले प्रकल्प आणि वाढत्या गुन्हेगारीविरोधात प्रदेश युवक काँग्रेसने ‘आवाज महाराष्ट्राचा, अमरावतीच्या परिवर्तनाचा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. युवक काँग्रेसचे अमरावती शहर (विधानसभा) अध्यक्ष वैभव देशमुख यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना या आंदोलनात्मक मोहिमेची घोषणा केली. शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जुनी प्रभाग पद्धतीची स्वच्छतेची कंत्राटे रद्द करून नियम व निकष मोडून मोठ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहेत, ज्यामुळे शहरात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छतेच्या कंत्राट वितरणात पारदर्शकता आणून ‘कचरामुक्त अमरावती’ संकल्पना साकार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सरकारी रुग्णालयांची क्षमता मर्यादित आहे. तेथील वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आणि कालबाह्य झाल्या आहेत. खाजगी रुग्णालयांमधील उपचार गरिबांना परवडणारे नसल्याने, सरकारी रुग्णालयांमध्ये अद्ययावत व पुरेशा सुविधा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची मागणीही युवक काँग्रेसच्या मोहिमेद्वारे केली जाणार आहे. शहराच्या पश्चिम व उत्तर भागातील ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या नवीन वस्त्यांमध्ये अद्याप रस्ते, वीज आणि सुरळीत पाणीपुरवठा झालेला नाही. या भागांत पायाभूत सुविधा तातडीने पुरवण्याची मागणीही युवक काँग्रेसच्या मोहिमेचा एक भाग आहे. शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. यासाठी शहरात ‘हॉकर्स झोन’ची उभारणी करून रस्त्यावरील कोंडी फोडण्यात यावी. इतवारा बाजार परिसरातील उड्डाणपुलाचे बांधकाम मागील सात वर्षांपासून रखडले आहे, तसेच राजकमल रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने नागरिकांना मोठा वळसा घ्यावा लागतो. हे बांधकाम त्वरित सुरू करून वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याची मागणीदेखील करण्यात आली. शहरातील काही तरुण नैराश्याकडे ढकलले जात आहेत, परिणामी गांजा, एम.डी. ड्रग्स आणि धारदार शस्त्रांची उघडपणे विक्री होत असून गुन्हेगारी वाढली आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योगांना चालना देऊन तरुणांना रोजगार द्यावा आणि पोलीस प्रशासनाने राजकीय हस्तक्षेपाशिवाय अवैध धंद्यांवर अंकुश लावून ‘भयमुक्त अमरावती’ तयार करावी, इत्यादी मागण्यासुद्धा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत. ‘आवाज महाराष्ट्राचा-अमरावतीच्या परिवर्तनाचा’ या मोहिमेचा रितसर कार्यक्रम आगामी ३१ मे रोजी पुण्यात होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होईल. या बैठकीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्थानिक समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन आंदोलनात्मक कृती निश्चित केली जाणार आहे.
