पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार!:19 वर्षीय मद्यधुंद तरुणाची भरधाव कार गरवारे पुलावरून खाली कोसळली, गुन्हा दाखल

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-27t213543415_1779898007.jpg




पुण्यात पुन्हा एकदा ड्रिंक अँड ड्राईव्हची धक्कादायक घटना घडली असून, दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्या अथर्व अमित जैन (वय 19) या तरुणाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या कारने थेट गरवारे पुलाचे रेलिंग तोडून खाली कोसळल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, या गंभीर निष्काळजीपणाबद्दल डेक्कन पोलिस ठाण्यात आरोपी तरुणावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 25 मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ ही घटना घडली. आरोपी तरुण डेक्कन जिमखाना परिसरातून जंगली महाराज रस्त्यावरून आपली कार (एमएच 31 एफआर 5863) घेऊन जात असताना, रात्रीची वेळ व मोकळा रस्ता असूनही तो अत्यंत बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे समोर आले आहे. गरवारे पुलावरून गुडलक चौकाच्या दिशेने जात असताना मद्यधुंद अवस्थेतील चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलाच्या रेलिंगवर जाऊन आदळली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की, कारने पुलाचे रेलिंग तोडले आणि ती थेट पुलावरून खाली कोसळल्याने हा थरारक अपघात घडला. या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली; रात्रीची वेळ असली तरी हा परिसर वर्दळीचा असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी तात्काळ मोठी गर्दी केली. सुदैवाने या थरारक घटनेत चालकाव्यतिरिक्त इतर कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित आरोपी तरुणाला नोटीस बजावून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed