पुण्याचा भिडेवाडा चित्ररथ अमरावतीत दाखल:खासदार वानखडेंसह अनेकांनी जाणून घेतले फुले दाम्पत्याचे कार्य
![]()
अमरावती येथे महात्मा जोतीराव फुले यांनी पुण्यात सुरू केलेली मुलींची पहिली शाळा ‘भिडेवाडा’ चित्ररथाच्या माध्यमातून पोहोचली आहे. हा चित्ररथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील पुतळ्याजवळ थांबला आहे. गुरुवारी खासदार बळवंतराव वानखडे यांच्यासह अनेक नागरिकांनी या चित्ररथाला भेट देऊन फुले दाम्पत्याच्या कार्याची माहिती घेतली. महात्मा फुले यांच्या २०२६ मधील द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चित्ररथाव्यतिरिक्त राज्यभरात विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जात आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या चित्ररथाची मांडणी केली असून, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडे, गीते, वचने आणि भाषणे सादर केली जात आहेत. चित्ररथात सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसह महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा हे विशेष आकर्षण ठरले. महात्मा फुले यांनी लिहिलेली पुस्तके आणि पेन यांसारख्या ज्ञानाच्या प्रतीकांची प्रभावी मांडणीही करण्यात आली होती. पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाडा आणि भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची प्रतिकृती या चित्ररथात साकारण्यात आली आहे. या माध्यमातून समता, बंधुता, न्याय आणि शिक्षणाचा संदेश दिला जात आहे. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राबवण्यात येत असलेला हा चित्ररथ उपक्रम समाजात समतेची जाणीव अधिक दृढ करून नवचैतन्य निर्माण करत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. हा विशेष चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत हा चित्ररथ राज्यातील गावोगावी आणि शहरांमध्ये फिरून समाजप्रबोधनाचे कार्य करणार आहे.
