दीप्ती चौधरींनी स्वीकारला पुणे काँग्रेस पश्चिम विभागाचा अध्यक्षपदाचा पदभार:काँग्रेस भवन येथे माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून पदभार हस्तांतरण
![]()
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम विभाग) च्या अध्यक्षपदाचा पदभार माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी गुरुवारी स्वीकारला. काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी माजी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून हा पदभार घेतला. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने माजी आमदार दीप्ती चौधरी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात बोलताना माजी अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने पुण्यासारख्या शहराचे अध्यक्षपद देऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठी संधी दिली. गेल्या चार वर्षांत त्यांनी निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम केले आणि काँग्रेस नगरसेवकांची संख्या वाढवली. अनेक ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सहकार्य केल्यामुळेच पक्षाची धुरा सांभाळणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. नवनिर्वाचित अध्यक्ष दीप्ती चौधरी यावेळी म्हणाल्या की, काँग्रेसची कार्यकर्ती ते पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष या प्रवासात अनेकांनी त्यांना साथ दिली. पक्षासाठी केलेल्या प्रामाणिक कामाचे फळ आज अध्यक्षपदाच्या रूपाने मिळाले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, सतेज उर्फ बंटी पाटील, निरीक्षक विनोद सुलतानपुरी आणि पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ नेते व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने त्या पक्षाच्या हिताचे काम करतील. येत्या काळात काँग्रेस पक्षाला ऊर्जा देण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नेत्यांच्या विचारांची काँग्रेस करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
