हिंगोली जिल्हा पोलिस दल बदल्यांनी ढवळून निघणार:शुक्रवारी 160 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या, पात्र कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-21t161539914_1779360396.jpg




हिंगोली जिल्हा पोलिस दल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनी ढवळून निघणार असून शुक्रवारी ता. २२ सकाळी १० वाजल्यापासून पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी बदली पात्र असलेल्या सुमारे १६० कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्हयातील शासकिय कार्यालयांमधून मागील काही दिवसांपासून बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या केल्या. तर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्या उपस्थितीत बदल्यांची प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान, आता पोलिस दलात बदल्यांची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ता. २२ सकाळी दहा वाजल्या पासून बदली प्रक्रिया सुरु होणार आहे. यामध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, जमादार, पोलिस शिपाई यांच्यासह महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये एकाच पोलिस ठाण्यात पाचवर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून सुमारे १६० कर्मचारी बदलीपात्र ठरले आहेत. या शिवाय पोलिस ठाणे निहाय रिक्तपदांची तसेच संभाव्य रिक्तपदांची माहिती तयार करण्यात आली आहे. समुपदेशन प्रक्रियेमध्ये रिक्तपदांची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना दाखवून त्यांची हवी त्या जागेवर बदली केली जाणार आहे. समुपदेशन बदलीमुळे कर्मचाऱ्यांच्या सोईनुसार बदल्या होणार असल्याने पोलिस ठाण्याची कार्यक्षमता वाढणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी समुपदेशन बदली प्रक्रियेसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी दिले आहेत. एकाच वेळी तब्बल १६० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याने जिल्हा पोलिस दल बदल्यांनी ढवळून निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *