‘तुमचं बरोबर आहे’ या मंत्राने कटू प्रसंग टळतात:मन करा रे प्रसन्न’ विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांचे व्याख्यान
![]()
मनाचा थांग भल्याभल्यांना लागत नाही. संत तुकाराम, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी मनाचे महत्त्व सांगितले आहे. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार येणारच. पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाची प्रसन्नता ठेवता येते हे संतांनी दाखवून दिले आहे. स्वतःबद्दलचे अवास्तव भ्रम, अहंकार, द्वेष, मत्सर या गोष्टी मनाच्या आरोग्याला बाधक आहेत. ‘तुमचे बरोबर आहे’ हा महामंत्र लक्षात ठेवला तर संघर्षाचे कटू प्रसंग टाळता येतात. जीवनातील प्रत्येक अनुभवाकडे खेळकरपणाने पाहिले. त्यातील विनोद शोधला, विश्वासाच्या माणसापाशी मन मोकळे केले तर मन प्रसन्न राहते. अशा प्रसन्न मनाच्या व्यक्तीच आयुष्यात यशस्वी होऊ शकतात.थोडक्यात मनाची प्रसन्नता ही यशाची गुरुकिल्ली आहे’ असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते डॉ.संजय उपाध्ये यांनी केले. ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर आणि मायबोलीचे संस्थापक स्व. विजूभाई माढेकर यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष मुकुंदराज कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सचिव डॉ. प्रशांत मोहिरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेंद्र श्रीश्रीमाळ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ.वैशाली मोहिरे आणि पल्लवी माढेकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष जवाहर माढेकर, संचालक अरुण शहा, व्यंकटेश कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मायबोलीचे संचालक जितेंद्र माढेकर, अमिता कुलकर्णी आणि अन्य कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. पती-पत्नीमधील विनोद, सामाजिक जीवनातील विसंगतीतून होणारे विनोद यांची मुक्त पखरण करीत डॉ. उपाध्ये यांनी साध्या-सोप्या शैलीतून, चिरंतन मूल्यांचे महत्त्व श्रोत्यांच्या मनावर हसत खेळत ठसवले. अंतर्मुख करणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
