Pune News | पुणेकरांनो ‘या’ भागातील PMPMLचे बस थांबे बदलले; वाचा सविस्तर बातमी
Pune News | पुण्यातील कात्रज (Katraj) परिसरातून रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महामेट्रो (MahaMetro) कडून नवीन मेट्रो स्टेशनच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे PMPML (PMPML) च्या अनेक बसमार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी नवीन थांबे आणि बदललेले मार्ग तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कात्रज पोलीस चौकीसमोरील पीएमपी बसस्थानकाजवळ बुधवारपासून मेट्रो स्टेशनचे काम अधिकृतपणे सुरू झाले आहे. या कामामुळे वाहतुकीवर ताण येऊ नये आणि प्रवाशांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने काही प्रमुख बसमार्गांचे थांबे पर्यायी ठिकाणी हलवले आहेत. कात्रज बायपास रोडवरील पुलाखालील मोकळ्या जागेतून आता अनेक बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
बस क्रमांक २, २३अ, ९१ क, २४, २४ अ, ९०, १०३, २३५, २३६, ३०१ आणि ३०१ अ या बसेस आता जुन्या स्थानकाऐवजी पुलाखालून सुटणार आहेत. तसेच ‘के-११’ ते ‘के-१४’ आणि ‘के-१८’ या विशेष बससेवाही त्याच ठिकाणाहून सुरू राहतील. रातराणी १ आणि २ या बससेवाही आता पुलाखालूनच धावणार आहेत. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या बदलांची नोंद घेणे आवश्यक ठरणार आहे.
Pune News | काही मार्गांवर नव्या वाहतूक योजना :
गुजरवाडी (Gujarwadi) बसस्थानकावरून सुटणाऱ्या ४२, २१८, २९१ आणि ३३९ क्रमांकाच्या बसेसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. या बसेस आता गुजरवाडीहून निघाल्यानंतर कात्रज चौकातून डावीकडे वळतील आणि पुलाखाली तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या थांब्यावरून प्रवाशांना घेऊन पुढे त्यांच्या नियमित मार्गावर जातील.
याशिवाय ४३, ४३ अ, ४४, ४५, २१४ आणि २२८ क्रमांकाच्या बसेस आता थेट कात्रज बायपास सर्व्हिस रोडवरून चालवण्यात येणार आहेत. मेट्रोच्या कामामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. PMPML प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, नव्या बदलांची माहिती घेऊनच प्रवास करावा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे.
