गणेशोत्सवात ध्वनी-प्रकाशाचा अतिरेक रोखा:सातारच्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिसांकडे मागणी, डीजेसह लेझर शोवर नियंत्रण ठेवण्याचे निवेदन

[ads1]


गणेशोत्सवाच्या उत्साहाला ध्वनी व प्रकाशाच्या अतिरेकाचे गालबोट लागू नये, यासाठी डीजे-डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज आणि तीव्र लेझर लाईटवर कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. कै. डॉ. कर्मवीर मार्तंडराव सूर्यवंशी (चाचा) फौंडेशन व सातारा समन्वय समितीच्या वतीने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवात मिरवणुका व विविध कार्यक्रमांदरम्यान ध्वनिक्षेपकांचा मोठ्या आवाजात वापर केला जातो. अनेकदा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, हृदयरुग्ण, विद्यार्थी, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. झोपेचा अभाव तसेच मानसिक तणावासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय गणेशोत्सवातील लेझर शोमधून होणाऱ्या तीव्र प्रकाशझोतामुळे नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लेझरच्या वापराबाबतही प्रशासनाने स्पष्ट नियम आखून त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले. गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून त्याचे स्वरूप ध्वनी-प्रकाशाच्या स्पर्धेत बदलू नये. मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिकांनी केले. नियमभंग करणाऱ्या मंडळांवर वेळ न दवडता कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *