कविता जीवनाच्या विविध छटांना शब्दरूपात व्यक्त करण्याचा प्रयत्न:प्रा. डॉ. नाना भडके यांचे प्रतिपादन; संगीत, साहित्यांची जुगलबंदी
![]()
मन हे नेहमी शब्दांपूर्वी जन्मते आणि कविता ही त्याची सावली असते. कधी दीर्घ, कधी अल्प, पण नेहमीच अंतःकरणाशी निगडित असते. जीवनाच्या विविध छटांना शब्दांच्या रूपात व्यक्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे कविता, तसेच संगीत आणि कविता यांचा संगम म्हणजे भावनांचा एक निराळाच प्रवाह असतो. जो मनाला शुद्ध करतो, स्थिर करतो, असे विचार प्रा. डॉ. नाना भडके यांनी केले. ते ‘विठ्ठलसुत’ काव्यसंग्रह प्रकाशन समारंभात बोलत होते. गायक, संगीतकार, गीतकार व कवी प्रा. डॉ. नाना भडके यांच्या ‘विठ्ठलसुत’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रालतो विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. मंचावर ज्येष्ठ विधिज्ञ राधेश्याम मोदी, विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ नाट्यकलावंत दिलीप देशपांडे, अभिजित परांजपे, सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची, श्री रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रवंशी, ज्येष्ठ शास्त्रीय गायक प्रा. डॉ. अनिरुद्ध खरे, कमलेश कोठारी, लेखक धनंजय देशपांडे उपस्थित होते. लेखक धनंजय देशपांडे यांनी ‘विठ्ठलसुत’ या काव्यसंग्रहावर लिहिलेल्या समीक्षणाचे अभिवाचन दिलीप देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वेदश्री प्रतिष्ठानच्या कलावंतांच्या सहकार्याने प्रा. डॉ. नाना भडके यांनी आपल्या काव्यसंग्रहातील अभंगाचे गायन केले. त्यांना हार्मोनियमवर रवी कसबेकर, तबल्यावर प्रवीण पंचघरे, मृदंगावर ज्ञानेश्वर यादगिरे, ऑक्टोपॅडवर सुनील कदम, सिंथेसायजरवर प्रवीण राऊत यांनी सिंथेसायजरवर साथ केली. राजेश जोशी यांनी बासरीवादन केले. प्रास्ताविक व निवेदन मोहिनी मोडक यांनी केले. प्रा. भडके यांची कन्या पूर्वी हिने आपल्या वडिलांविषयी मनोगत व्यक्त केले आणि आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नाट्यकलावंत विद्या जोगळेकर, इंगळे, संस्कार भारतीचे महानगराध्यक्ष डॉ. राजकुमार हेडा, प्रख्यात साहित्यिक रामप्रकाश वर्मा, ज्येष्ठ कवी कृष्णकुमार शर्मा, चंदा जयस्वाल, ज्येष्ठ कविद्वय सुनील देशपांडे व प्रशांत असनारे, डॉ. किशोर देशपांडे, अशोक ढेरे, अविनाश परळीकर, सुधीर देशपांडे, यांच्यासह सीताबाई कला महाविद्यालयातील प्राध्यापक व साहित्यरसिकांची उपस्थिती होती. विपरीत परिस्थितीला तोंड देत विविध क्षेत्रात प्रा. डॉ. नाना भडके मिळवलेले यश विशेष आहे. त्याच्या कवितांना फक्त लांबी रुंदी नाही, तर विचारांची खोली आहे, असे आपल्याला निश्चितच जाणवते. विविध विषय हाताळणाऱ्या त्याच्या कवितांमध्ये विठुरायावरील त्याचे निस्सीम प्रेम दिसते. अनेकदा आयुष्यातील अव्यक्त अबोल दुःखे त्याच्या कवितेतून प्रकट होतात. जीवनाच्या तप्त भट्टीतून बाहेर पडणाऱ्या लखलखत्या सोन्यासारखी त्याची कविता प्रतीत होते. नानाच्या कवितांमध्ये इतर कुणाचाच प्रभाव जाणवत नाही. त्याच्या कविमनातील भावनांची गुंतागुंत, ईश्वरभक्ती, मातेवरील प्रेम, श्रद्धा या सर्वांचे समर्थ चित्रण त्याच्या कवितांमधून प्रतिबिंबित होते. संस्कारांमुळे कवितेचे मीटर आपसूकच साधले जाते, असे मनोगत यावेळी ज्येष्ठ शास्त्रीय गायक प्रा. डॉ. अनिरुद्ध खरे यांनी व्यक्त केले.
