कृउबास संचालकांत एकमताच्या अभावामुळे मंत्री महाजनांची एन्ट्री:ऐनवेळी नाव बदलण्याच्या परंपरेमुळे सूत्रे घेतल्याची चर्चा
![]()
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची पकड मजबूत असली तरी अंतर्गत राजकारणाने सध्या डोकेवर काढले आहे. विशेष म्हणजे नवीन टर्ममधील दोन्ही सभापतींना अविश्वास प्रस्तावामुळे आपली पदे गमवावी लागली आहेत. या पार्श्वभूमीवर, संचालकांवर विश्वास नसल्याने अखेर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आता या निवडीचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेतले आहे. बाजार समितीच्या राजकारणात अविश्वासाचे सत्र सुरूच आहे. यापूर्वीचे सभापती श्यामकांत सोनवणे सुमारे अडीच वर्षे पदावर होते; मात्र त्यांच्यावरही अविश्वास दाखवण्यात आला होता. त्यानंतर आलेले सुनील महाजन यांना तर अवघ्या 7 महिन्यांतच पाय उतार व्हावे लागले. 12 संचालकांनी त्यांच्याविरुद्ध 27 एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.भाजपचे संख्याबळ अधिक असूनही संचालकांमध्ये एकमत होत नसल्याचे या वारंवार होणाऱ्या अविश्वास प्रस्तावांतून स्पष्ट होत आहे. आजच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते यावर 18 मे रोजी होणाऱ्या निवडीची केवळ औपचारिकता अवलंबून असेल. सभापती पदासाठी लक्ष्मण पाटीलकी मनोज चौधरी? चुरस टोकाला सध्या सभापती पदासाठी भाजपच्या गोटात दोन नावांची मोठी चुरस आहे. पूर्वी सभापती असताना अविश्वास प्रस्तावानंतर पायउतार झालेले लक्ष्मण पाटील पुन्हा स्पर्धेत आहे. मंत्री महाजन यांनीच त्यांना शब्द दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर सहकार क्षेत्रातील 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले मनोज चौधरी यांनीही प्रबळ दावा केला आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अनुभवाच्या जोरावर संधी मागितली असून, संधी मिळाल्यास चौधरी पहिल्यांदाच सभापती होतील. संचालकांची आज बैठक होणार उपनिबंधकांच्या पत्रानुसार 18 मे रोजी सभापती निवडीसाठी अधिकृत बैठक बोलावण्यात आली आहे; मात्र तत्पूर्वी 15 मे रोजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात सभापतीच्या नावाबाबत सविस्तर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनात व्यग्र असल्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वी वेळ दिला नव्हता; मात्र आता त्यांच्या उपस्थितीतनव्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.बाजार समितीत ऐनवेळी नाव बदलण्याची परंपरा असल्याने, आजच्या बैठकीकडे आता राजकीय पदाधिकऱ्यासह जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
