‘उतारवयात औषधोपचारासाठी कुणी पेन्शन देता का पेन्शन?’, महापालिकेला पेन्शनरांचा सवाल; वेतनासह पेन्शन देण्याचे आश्वासन‎

0
orig_new-project-2026-05-15t075501164_1778811953.jpg




‘उतारवयात औषधोपचारासाठी पेन्शन देता का पेन्शन?’ असा संतप्त सवाल करत महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महापालिका प्रशासनाविरोधात दंड थोपटले. पेन्शनर असोसिएशनने गुरुवारी महापालिकेत धरणे आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र ताशेरे ओढण्यात आले. अखेर आयुक्त यशवंत डांगे यांनी दोन महिन्यांचे वेतन व पेन्शन तातडीने देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. असोसिएशनचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. मार्च आणि एप्रिल महिन्याची पेन्शन रखडल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. वेळेवर पेन्शन न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, काहींना उपचाराअभावी जीव गमवावा लागला आहे, असा गंभीर आरोप कामगार नेते कॉ. अनंत लोखंडे आणि एन. एम. देशमुख यांनी केला. आंदोलनाच्या सुरुवातीलाच दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात थकीत पेन्शनसह, सहाव्या वेतन आयोगाचे नऊ हप्ते, जीएसटी अनुदान वेळेवर मिळणे आणि बंद पडलेली पेन्शन विक्री योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. आयुक्तांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत थकीत रक्कम लवकरच अदा करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात मधुकर खताळ, एच. आर. सय्यद, द्वारका किंगर, संजय मुठाळ, बबन काळे यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. पेंशनरांच्या प्रमुख मागण्या { मार्च आणि एप्रिलची थकीत पेन्शन तातडीने मिळावी. { महिन्याच्या १ तारखेलाच पेन्शन बँक खात्यात जमा व्हावी. { सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे उर्वरित नऊ हप्ते द्यावेत. { बंद केलेली ‘पेन्शन विक्री योजना’ महापालिकेने पुन्हा सुरू करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed