दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:पुराचा धोका टाळण्यासाठी सीना नदी पात्राचे रुंदीकरण, खोलीकरण सुरू
![]()
अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून अरुंद झालेल्या सीना नदीच्या पात्राचा श्वास मोकळा करण्यासाठी पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून महानगरपालिकेमार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बुरुडगाव ते लोखंडी पुलापर्यंत सुमारे अडीच किमीचे काम केले जाणार आहे. या कामामुळे पुराचा धोका टळणार आहे. शहरातून वाहणारे नदीचे पात्र १४ किलोमीटर लांबीचे आहे. या संपूर्ण पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण चार ते पाच टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अडीच ते तीन किलोमीटर लांबीचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पूल ते बुरुडगाव हद्दीपर्यंतच्या पात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनामार्फत २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जलसंपदा विभागाने सीना नदीची सरासरी रुंदी १०० मीटर निश्चित करून दिली आहे. मात्र, सद्यस्थितीत नदीकाठी अनेक ठिकाणी केवळ ४० मीटरपर्यंतच पात्र उपलब्ध आहे. उपलब्ध रुंदीच्या प्रमाणात त्या-त्या ठिकाणी पात्राची खोली किती असावी, याचे तांत्रिक निकष जलसंपदा विभागाने निश्चित करून दिले आहेत. एका वर्षात हा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढून पुराचा धोका टळेल मागील वर्षी मे महिन्यात व पावसाळ्यात अहिल्यानगर शहरात आणि नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला मोठा पूर आला होता. अतिक्रमणे, अरुंद, उथळ आणि गाळाने भरलेले असल्याने पुराचे पाणी वाहून जाण्यात अडथळे आले. परिणामी, नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. रुंदीकरण आणि खोलीकरणामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल. पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तरी, पुराचे पाणी वस्त्यांमध्ये न शिरता वेगाने पुढे वाहून जाईल. तसेच, पात्र खोल झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया वेगाने होईल. सीना नदी पात्राची हद्द निश्चिती, अतिक्रमणे हटविणे आवश्यक गेल्या अनेक वर्षांत सीना नदी पात्रातील अतिक्रमणे आणि गाळपेर जागा बळकावून उभ्या राहिलेल्या इमारतींमुळे नदीचे पात्र अनेक ठिकाणी अत्यंत अरुंद झाले आहे. १०० मीटरचे पात्र काही ठिकाणी थेट ४० मीटरवर आले आहे. यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. रुंदीकरण व खोलीकरण कामासह सीना नदीच्या पात्राची हद्द निश्चिती होणे आवश्यक आहे. तसेच, नदी पात्रात भराव टाकून टाकण्यात आलेल्या शेड व इतर अतिक्रमणेही हटवणे गरजेचे आहे.
