बचत गटाच्या 64 महिलांना अडीच लाखांचा गंडा:विंचूरच्या दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत गरजू, कष्टकरी महिलांना पीठ गिरणी, शिलाई मशीन देण्याचे आमिष
.

विंचूर येथे दिव्यज्योत बहुउद्देशिय संस्थेमार्फत महिंलाना मोफत शिवणकाम व ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण व सरकारच्या विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशिन व १५ हजार रुपये रोख मिळवून देण्याचे काम करतो. संस्थेमार्फत महिलांना पीठ गिरणी, शिलाई मशीन, वॉशिंग मशीन व फ्रिज देणार आहोत, असे आमिष दाखवून महिलांकडून पैसे गोळा करून फसवणूक केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात लासलगाव पोलिस कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला यासंदर्भात ताब्यात घेण्यात आले आहे.
विविध वस्तू देण्याच्या आमिषाने महिलांना फक्त २५% रक्कम भरावी व उर्वरित रक्कम आम्ही भरतो, असे सांगून हनुमाननगर येथील बचत गटाच्या ६४ महिलांकडून अडीच लाखाची रक्कम घेऊन पैसे, वस्तू न देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध लासलगाव पोलिस कार्यालयात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मनिषा प्रमोद कडलग (रा. लोळगे वस्ती, हनुमाननगर, विंचूर, ता. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय बोराळे, जयश्री संजय बोराळे ( दोघे रा. सोहम सिटी, लासलगाव), विशाल कान्हू गरूड (रा. कोटमगाव) या तिघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विशाल गरुड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संस्थेतर्फे सात ते आठ महिन्यांपासून अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये २० ते ३० महिलांचे बचत गट करून त्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा दिखावा केला जात होता. ब्युटी पार्लर व मोफत शिवणकाम प्रशिक्षणासाठी बचत गट स्थापन केले जात होते. महिलांना केवळ २५ टक्के रक्कम भरण्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर सरकारकडून अनुदान मिळणार असल्याचे खोटे आश्वासन महिलांना देण्यात आले.
संस्थेचे सदस्य विशाल गरुड यांना ऑनलाईन अॅपवर २०,००० रुपये दिले. सुमारे ७४ महिंलानी प्रत्येकी ३,५०० ते १०,००० अशी एकूण अंदाजे २५,०००० रु. एवढी रक्कम वेळोवेळी ऑनलाईन दिली आहे. त्यांनी सदर रक्कम स्वतःच्या ताब्यात घेवून महिलांना दिव्यज्योत बहुउद्देशिय संस्था, नाशिक नावाने पावती देवून ठरल्याप्रमाणे फिर्यादी व इतर महिंलाना वस्तू न देता फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णूनगर तसेच परिसरात अनेक महिलांना सुरुवातीला गिरणी तसेच इतर साहित्य देण्यात आले होते, त्यामुळे महिलांचा विश्वास बसल्याने अनेक महिला पैसे भरण्यासाठी तयार झाल्या. अनेक गोरगरीब आणि कष्टकरी महिलांनी आपल्या कष्टाची कमाई यामध्ये गुंतवली. मात्र, कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. – सरला मुरकुटे, विष्णूनगर
अत्यंत कमी दरात गिरणी वॉशिंग मशीन फ्रीज मिळणार असल्याचे कळताच निफाड, सिन्नर, येवला व नांदगाव चांदवड तालुक्यांतील अनेक महिंलाकडून अशा योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करून फसवणूक केली असून, अनेक गोरगरीब महिला यात अडकल्याने त्यांची कष्टाची कमाई हिरावून नेल्याने कष्टकरी महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
४ ते ५ महिन्यांपासून महिलांना वस्तू मिळत नसल्याने अनेक गावांमध्ये या संस्थेच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय बोराळे व त्याची पत्नी जयश्री बोराळे (रा. मूळ गाव साकोरा, ता. नांदगाव) हे दोघे फरार आहेत. लासलगाव पोलिस कार्यालयात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले.
