पुणे महामार्गावर वऱ्हाडींच्या बससह चार वाहनांचा अपघात:35 जखमी, पळवे खुर्द शिवारातील घटना, कारला वाचवण्याच्या प्रयत्नात लक्झरी बसचालकाचे नियंत्रण सुटले

0
reassign_transfar_253_17787725846a05ea68141d7_accidentnews.jpg


.

नगर-पुणे महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण साखळी अपघात झाला. लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी उत्साहात आळंदीकडे निघालेल्या राजळे परिवाराच्या आनंदावर विरजण पडले. पळवे खुर्द शिवारातील हॉटेलसमोर लक्झरी बस, कंटेनर, एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण साखळी अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील वऱ्हाडी लक्झरी बसने (एमएच १६ डीके ६०५१) आळंदीकडे निघाले होते. सकाळी ११ च्या सुमारास एका स्विफ्ट कारला (एमएच २० जीई १७८४) वाचवण्याच्या प्रयत्नात लक्झरी बस चालकाचे नियंत्रण सुटले. बसने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर जात नगरकडे येणाऱ्या कंटेनरला (एचआर ३८ एडी ००६८) भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. याच वेळी कंटेनरच्या मागून येणारी एसटी बसही त्यावर आदळली.

अपघातानंतर लक्झरी आणि कंटेनरचे चालक केबिनमध्येच अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून क्रेनच्या सहाय्याने चालकांना बाहेर काढले आणि रुग्णवाहिका पाचारण केल्या. सुपे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ५ रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना सुपा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताचे वृत्त समजताच खासदार नीलेश लंके यांनी पारनेरमधील आपले नियोजित कार्यक्रम सोडून थेट रुग्णालय गाठले. त्यांनी जखमींची व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन धीर दिला. सुपा पोलीस पुढील पंचनामा करत आहेत.

वाहतूक दोन तास ठप्प अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मैलोन्मैल रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर सुमारे दोन तासांनी वाहतूक पूर्ववत झाली. जखमींना डोके, छाती आणि हातापायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. सुपा येथील खाजगी रुग्णालयात युद्धपातळीवर उपचार सुरू असून पोलीस जखमींची नावे नोंदवण्याचे काम करत असल्याची माहिती आहे.

क्रेन बोलावून काढले ^ माझ्या हॉटेल समोर अपघात झाला. मी ताबडतोब धावलो. एक एसटीही मागच्या बाजूला येऊन आदळली होती. जखमींना रुग्णालयात पाठवण्यासाठी रुग्णवाहिका बोलावल्या. वाहनात अडकलेल्या चालकांना बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवली. प्रसाद तरटे, व्यावसायिक, पळवे खुर्द.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed