औषध विक्रेत्यांच्या संपावर प्रशासनाची पर्यायी व्यवस्था:20 मे रोजीच्या देशव्यापी बंदमध्ये औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना
![]()
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २० मे रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासनाने औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. नागरिकांना आवश्यक औषधे अखंडपणे उपलब्ध व्हावीत, यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सज्ज झाले आहे. विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बुधवार, २० मे रोजी एक दिवसीय देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. या बंदमध्ये देशातील ठोक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार असून, त्यांनी आपले व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. मुंबई येथील सह आयुक्त (औषधे) तथा नियंत्रण प्राधिकारी यांच्या निर्देशानुसार, अमरावती जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न असलेली औषध दुकाने तसेच २४ तास सुरू असणाऱ्या औषध दुकानांशी प्रशासनाने समन्वय साधला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधित दुकानांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त (औषधे) डॉ. अ. मा. माणिकराव यांनी दिली. प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवरदेखील आवश्यक औषधी दुकाने सुरू राहतील, यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे. या आणीबाणीच्या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था आणि आरोग्य सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच खाजगी व निमसरकारी रुग्णालयांच्या प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना या बंदच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. औषध पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण किंवा तातडीची गरज भासल्यास, अमरावती एफडीए कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिक ०७२१-२६६५८९२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा jcamrawati2022@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने औषधे उपलब्ध करून देण्यास प्रशासन पूर्ण मदत करेल, अशी ग्वाही डॉ. माणिकराव यांनी दिली.
