राष्ट्रवादीत पवार कुटुंबाचे वर्चस्व!:पक्षाच्या तिजोरीवर आता पार्थ, जय आणि सुनेत्रा पवारांचे नियंत्रण; तटकरे-पटेलांचा पत्ता कट?
![]()
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत राजकारणात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरे यांना मोठा धक्का देत, अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी पक्षाच्या सर्व आर्थिक आणि धोरणात्मक सूत्रांवर आपली पकड मजबूत केली आहे. २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीमुळे या ‘फॅमिली पॅक’ वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या कार्यकारणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, राष्ट्रीय महासचिवपदी पार्थ पवार, तर जय पवार यांच्यावर राष्ट्रीय सचिव आणि खजिनदारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिजोरीच्या चाव्या आता ‘पवार’ कुटुंबाच्या हाती या नियुक्तीमुळे पक्षाचा संपूर्ण निधी, बँक व्यवहार आणि महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रिया आता केवळ सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांच्या भोवतीच फिरणार आहे. विशेष म्हणजे, पक्षाच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी आता केवळ या तिघांपैकी एकाची स्वाक्षरी पुरेशी असणार आहे. यापूर्वी हे अधिकार अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि वाय. पी. त्रिवेदी यांच्याकडे संयुक्तपणे होते. मात्र, नव्या रचनेत पटेल आणि त्रिवेदी यांना या प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर काढण्यात आले आहे. जबाबदाऱ्यांचे वाटप कायम? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 29 एप्रिलच्या यादीत तांत्रिक चूक असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र आता दोन दिवस उलटूनही यादी दुरुस्त केलेली यादी जाहीर न झाल्याने 29 एप्रिलच्या यादीनूसारच पक्षात जबाबदाऱ्यांचे वाटप कायम आहे की काय?, असा सवाल उपस्थित होत आहेत. ज्येष्ठ नेत्यांना नाकारल्याची चर्चा पक्षाच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना या नव्या नियुक्त्या करताना पूर्णपणे अंधारात ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी आर्थिक अधिकार स्वतःकडे असणे आवश्यक असल्याचे ओळखून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ही नवी यादी अत्यंत गोपनीय पद्धतीने तयार करून थेट निवडणूक आयोगाकडे पाठवली. पुढील राजकीय संघर्षाची नांदी? अजित पवार यांच्या निधनानंतरही पक्षाच्या आर्थिक बाबींवर प्रफुल्ल पटेल यांचा प्रभाव होता. मात्र, आता त्यांचे पंख छाटल्यामुळे पक्षात दोन गट पडण्याची किंवा नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रफुल्ल पटेल यांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र या नव्या रचनेमुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीत मोठ्या राजकीय हालचाली होऊ शकतात.
