विमा नसलेल्या गाडीच्या मालक-चालकाला 44.75 लाखांचा दंड:पुणे अपघात न्यायाधिकरणाचा महत्त्वपूर्ण निकाल, कुटुंबाला 10 वर्षांनी न्याय

0
b600993c-e5d6-41c7-82f4-4b3e74250fd5_1778742827323.jpg




पुणे मोटार अपघात न्यायाधिकरणाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात विमा नसलेल्या वाहनाच्या मालक आणि चालकाला 44 लाख 75 हजार ३2३ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. शिरूर-पुणे रस्त्यावर 2015 मध्ये झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या कुटुंबाला तब्बल 10 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. ही रक्कम 7 टक्के व्याजासह देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मृत रामदास जगताप यांचा 26 नोव्हेंबर 2015 रोजी शिरूर-पुणे रस्त्यावर कामावरून घरी परतत असताना अपघात झाला होता, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय 41 वर्षे होते. ते एका नामांकित कंपनीत नोकरी करत होते आणि त्यांचा मासिक पगार 21,719 रुपये होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले आणि वयोवृद्ध आई असा परिवार आहे. रामदास यांना धडक देणाऱ्या गाडीचा विमा उतरवलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी ॲड. अमित राठी यांच्यामार्फत पुणे न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. गाडी मालक आणि चालकाने न्यायालयात हजर राहून आपला बचाव केला. त्यांनी दावा केला की, हा अपघात रामदास यांच्याच चुकीमुळे झाला होता. पोलिसांनी सादर केलेला घटनास्थळाचा पंचनामा आणि रामदास यांच्या नोकरी व पगाराचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. ॲड. अमित राठी यांनी युक्तिवाद केला की, रामदास हे कुटुंबाचे एकमेव कमावते सदस्य होते. अपघाती गाडीचा विमा नसल्याने नुकसान भरपाईची संपूर्ण जबाबदारी मालक आणि चालकाची आहे. पुणे मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य बी. डी. कुलकर्णी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर अर्जदारांची मागणी मान्य करत मालक आणि चालकाला 44 लाख 75 हजार ३2३ रुपये आणि त्यावर 7 टक्के दराने व्याज देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात रामदास यांच्या पत्नी आणि मुलांतर्फे ॲड. अमित राठी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. पूनम मावाणी आणि ॲड. आदित्य जाधव यांनी सहकार्य केले. रामदास यांच्या आईतर्फे ॲड. मयुरी कासट यांनी युक्तिवाद केला. या महत्त्वपूर्ण निकालामुळे विमा नसलेल्या वाहन मालकांना मोठा इशारा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed