पुण्यात गुलाबो गॅंगचे मोदी सरकारविरोधात अनोखे आंदोलन:सोन्याची खरेदी टाळण्याच्या आवाहनावर 'झालमोरी बेचो' घोषणा
![]()
केंद्र सरकारने नागरिकांना पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पुण्यात ‘गुलाबो गॅंग’ आणि ‘बिटिया फाउंडेशन’च्या वतीने अनोखे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. लक्ष्मी रोडवरील शगुन चौक आणि सराफी पेढ्यांच्या परिसरात “झालमोरी बेचो, सोना मत बेचो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी आंदोलक महिलांनी हातात झालमोरी घेऊन शगुन चौकातील विविध सराफी दुकानांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी दुकानदारांना प्रतीकात्मक स्वरूपात झालमोरी देऊन, आता सोने सोडून झालमोरी विकण्याचा उपहासात्मक सल्ला दिला. प्रसिद्ध सराफ व्यावसायिक सचिन अष्टेकर यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांनाही झालमोरी भेट दिली आणि सरकारच्या भूमिकेवर टीका केली. या आंदोलनाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी केले होते. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “वाढती महागाई आणि सरकारच्या सतत बदलणाऱ्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीपासून नागरिकांना दूर ठेवण्याचे सरकारचे प्रयत्न हास्यास्पद आहेत.”
या आंदोलनात गुलाबो गॅंग आणि बिटिया फाउंडेशनच्या अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यामध्ये शोभा पणीकर, भारती लोंढे, कीर्ती जाधव, पारुल ताई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्यांवर येणारा ताण आणि महागाईकडे लक्ष वेधणे, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. या उपहासात्मक आंदोलनाने लक्ष्मी रोडवर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सरकारच्या धोरणांविरोधात व्यक्त झालेला हा ‘झालमोरी’ स्टाईल निषेध सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
