[ads1]
![]()
गणेशोत्सवात एकीकडे पुण्यात डीजेवर प्रतिबंधाचा मागणी होत असताना आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण आणि लेझर लाईटमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची गंभीर दखल घेत नागपूर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरात डीजे, डॉल्बी साऊंड, मॉडिफाइड साऊंड सिस्टिम, डीजेची वाहने तसेच बीमलाईट आणि लेझर बीमलाईटच्या वापरावर 1 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. गुरुवार, 3 सप्टेंबरच्या रात्रीपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार असून, आगामी सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक तसेच संबंधित कार्यक्रमांमध्ये प्रतिबंधित साउंड सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे. गणेशोत्सवासह अनेक सणांच्या पार्श्वभूमीवर निर्णय नागपूर शहरात 4 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव साजरे होणार आहेत. यामध्ये गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुद्दीन बाबा छब्बीसवी, गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच दुर्गादेवीच्या मूर्तींच्या आगमन-विसर्जन मिरवणुका यांचा समावेश आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम आणि धार्मिक आयोजन होत असल्याने ध्वनीवर्धक, डीजे, डॉल्बी आणि विविध प्रकारच्या प्रकाशयंत्रणांचा वापर वाढतो. त्यातून ध्वनीप्रदूषणाबरोबरच वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. नेमकी कशावर बंदी? नागपूर पोलिसांच्या आदेशानुसार उत्सवांच्या काळात खालील उपकरणे आणि व्यवस्थांवर निर्बंध राहणार आहेत. त्यामुळे केवळ डीजे वाजवण्यावरच नव्हे, तर डीजेची यंत्रणा घेऊन जाणाऱ्या वाहनांवर आणि मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या तीव्र प्रकाशयंत्रणांवरही निर्बंध आले आहेत. लेझर लाईटमुळे अपघाताचा धोका; पोलिसांनी सांगितले कारण विश्वास नांगरे पाटील यांनी आदेशामागील कारण स्पष्ट करताना उत्सवांच्या काळात मिरवणुका आणि स्थानिक कार्यक्रमांमध्ये बीमलाईट व लेझर बीमलाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे नमूद केले आहे. अशा तीव्र प्रकाशामुळे नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. विशेषतः रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर लेझर किंवा तीव्र प्रकाश पडल्यास काही काळ दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. याशिवाय मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीममुळे नागरिकांना होणारा त्रास, ध्वनीप्रदूषण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन पोलिसांनी उत्सव सुरू होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे. रुग्ण, ज्येष्ठ आणि लहान मुलांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास गणेशोत्सव आणि इतर सणांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे, डॉल्बी आणि इतर साऊंड सिस्टीमचा वापर होत असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतो. विशेषतः रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी आणि आवाजामुळे त्रास होणाऱ्या नागरिकांना मोठ्या आवाजाचा फटका बसतो. एकीकडे मंडळांना आणि नागरिकांना उत्सव उत्साहात साजरा करण्याचा अधिकार आहे, तर दुसरीकडे इतर नागरिकांच्या आरोग्याचा, शांततेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी यंदा उत्सवांच्या काळात आवाज आणि प्रकाशावर कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात डीजेच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले असतानाच नागपुरात निर्णय नागपुरातील या निर्णयाला पुण्यात सुरू असलेल्या डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या चर्चेची पार्श्वभूमीही आहे. पुण्यात गणेशोत्सवातील डीजे, डॉल्बी आणि ढोल-ताशांच्या आवाजावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. सामान्य नागरिक विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडल्यानंतर हा विषय अधिक चर्चेत आला. बापट यांनी गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये होणाऱ्या मोठ्या आवाजावर आक्षेप घेतला होता. ध्वनीप्रदूषणामुळे पुणेकरांना त्रास होत असल्याचे सांगत त्यांनी डीजे तसेच मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमवर निर्बंधांची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर बापट यांना पुण्यात मारहाण झाल्याची घटना घडली आणि त्यावरून राजकीय नेत्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेमुळे गणेशोत्सव, डीजे आणि नागरिकांचा शांततेचा अधिकार हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. नागपूर पोलिसांचा आदेश वाद टाळण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आगामी काळात नागपुरात एकापाठोपाठ विविध सण आणि मिरवणुका होणार आहेत. अशा वेळी डीजे, डॉल्बी, मॉडिफाइड साऊंड सिस्टीम आणि प्रकाशयंत्रणांच्या वापरावरून गणेश मंडळे, आयोजक, विविध संघटना, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासन यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असते. विशेषतः मिरवणुकीदरम्यान आवाजाची पातळी, डीजेच्या वाहनांची संख्या, साऊंड सिस्टीमचा वापर आणि लेझर लाईट यावरून वाद झाल्यास त्याचे रूपांतर कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नात होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी उत्सव सुरू होण्यापूर्वीच स्पष्ट नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आदेश मोडल्यास कारवाईचा इशारा नागपूर पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर, आयोजकांवर तसेच संबंधित डीजे चालक किंवा साऊंड सिस्टीम पुरवठादारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आगामी सणांमध्ये नियमांचे पालन करण्याचे मोठे आव्हान गणेश मंडळांसमोर असणार आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नसून 1 नोव्हेंबरपर्यंत विविध सण-उत्सवांच्या कालावधीत लागू राहणार आहे. त्यामुळे नागपूर शहरातील सार्वजनिक मिरवणुका आणि कार्यक्रमांमध्ये डीजे आणि लेझर लाईटचा वापर करण्यास आयोजकांना मोठी मर्यादा येणार आहे. पुणे आणि नागपूरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डीजेचा मुद्दा ऐरणीवर पुण्यात नागरिकांच्या मागण्या, मंडळांची भूमिका आणि राजकीय प्रतिक्रियांमुळे डीजेचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दुसरीकडे नागपुरात पोलिस प्रशासनाने थेट प्रतिबंधात्मक आदेश काढून डीजे आणि लेझर लाईटवर नियंत्रण आणले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असला तरी उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषण, नागरिकांची गैरसोय, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांचा त्रास तसेच वाहतुकीच्या सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक असल्याची भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली आहे. आता नागपूरमधील गणेश मंडळे आणि इतर उत्सव आयोजक या आदेशाची कशी अंमलबजावणी करतात, पोलिसांकडून नियमांची अंमलबजावणी किती कठोरपणे केली जाते आणि त्यावर मंडळांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला: वडेट्टीवार, पवार, अंधारेंकडून संताप व्यक्त; पोलिस संरक्षणाची मागणी पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना अचानक आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
[ads2]
पुण्यात वाद, पण नागपुरात DJ वर थेट बंदी:1 नोव्हेंबरपर्यंत डीजे अन् लेझर लाईट पूर्णपणे बॅन; पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय
















Leave a Reply