महिला PSIला 3 लाखांची लाच घेताना पोलिस ठाण्यातच रंगेहाथ पकडले:गुन्ह्याची बी-फायल पाठवण्यासाठी मागितले पैसे, पुण्याच्या दिघी पोलिस ठाण्यात एसीबीची कारवाई




पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दिघी पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) चेताली गणपत गापट (वय 35) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई दिघी पोलिस ठाण्यातच करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि त्याच्या तपासाची जबाबदारी पीएसआय चेताली गापट यांच्याकडे होती. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि भविष्यातही सहकार्य करण्याच्या मोबदल्यात गापट यांनी सुरुवातीला आठ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, आरोपी अधिकाऱ्याने तडजोडीअंती तीन लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून तीन लाख रुपये स्वीकारताना पीएसआय चेताली गापट यांना एसीबीच्या पथकाने पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आरोपी महिला अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुहास हटेकर, पोलिस निरीक्षक मिथुन म्हात्रे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचेची रक्कम आठ लाखांवरून तीन लाखांवर तक्रारदाराकडून सुरुवातीला तब्बल आठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. एसीबीच्या पडताळणीनंतर तडजोडीअंती ही रक्कम तीन लाखांवर निश्चित करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून तीन लाख रुपये स्वीकारताना महिला पीएसआयला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे अशी माहिती एसीबीने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *