एटीएसची विदर्भात छापेमारी:भंडारा-चंद्रपुरात पाकिस्तानी दहशतवाद्याच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची चौकशी

0
4f0a039f-1584-4266-afcb-4e8e2447b01a_1778662134499.jpg




महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) विदर्भातील भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करणाऱ्या आणि त्याच्याशी डिजिटल माध्यमांतून संपर्कात असलेल्या काही तरुणांची चौकशी करण्यात आली. संशयास्पद हालचालींची गंभीर दखल घेत एटीएसने आज सकाळी ही छापेमारी केली. नागपूर एटीएसच्या पथकाने दोन्ही जिल्ह्यांतील संशयितांच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या. या छाप्यांना नागपूर एटीएस युनिटने दुजोरा दिला आहे. अद्याप कोणालाही अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नाही, मात्र काही जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. सूत्रांनुसार, चौकशीत काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने त्यांना सोडून देण्यात आले. एटीएसचे सायबर सेल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवून होते. या तपासणीत भंडारा आणि चंद्रपूर येथील काही व्यक्ती एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या विचारधारेने प्रभावित असल्याचे आणि त्याच्या सोशल मीडिया पेजेसला नियमितपणे फॉलो करत असल्याचे समोर आले. या संशयितांचे हेतू आणि त्यांचे कोणत्याही देशविरोधी नेटवर्कशी संबंध आहेत का, याचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. एटीएस पथकांनी संशयितांच्या घरांची झडती घेतली असून त्यांचे मोबाईल फोन, सिम कार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली. केवळ विदर्भातच नव्हे, तर अशाच प्रकारची कारवाई सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात सुरू असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले. डिजिटल माध्यमांतून तरुणांचे ‘माईंड वॉशिंग’ करण्याचा किंवा त्यांना कट्टरवादाकडे ओढण्याचा जागतिक कट तर नाही ना, या दिशेने तपास यंत्रणा तपास करत आहेत. हे छापे प्रामुख्याने शहजाद भट्टी नावाच्या परदेशातून कार्यरत असलेल्या गँगस्टर आणि दहशतवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीशी संबंधित नेटवर्कचा छडा लावण्यासाठी टाकण्यात आले आहेत. संशयित व्यक्ती या नेटवर्कच्या संपर्कात होत्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना देशविरोधी कृत्यांसाठी चिथावणी दिली जात असल्याचा एटीएसला संशय आहे. ही चौकशी सध्या प्राथमिक स्तरावर आहे. राज्यभरात सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत 40 पेक्षा जास्त संशयितांची चौकशी केली जात असून, अनेक डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed