डोक्यावर हात ठेवून आजार बरा करण्याचा दावा:मुंबई पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या, मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचाही दावा

0
image-resize-color-correction-and-ai-2026-05-13t14_1778663649.png




भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात हल्लकल्लोळ माजला असताना आता मुंबई पोलिसांनी केवळ डोक्यावर हात ठेवून आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या 4 भोंदूंना बेड्या ठोकल्या आहेत. तुमच्या देवाची पूजा करून आजार बरा होत नाही. आमच्या देवाची प्रार्थना करून पाहा, असे म्हणत हे चौघे अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सांताक्रूझ पूर्व येथील आशा उपाध्याय (45) नामक महिलेने या प्रकरणी मालाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आशा उपाध्याय या गृहिणी आहेत. त्यांना मागील 7 वर्षांपासून थायरॉइड व उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांच्या संपर्कातील उषा गुप्ता नामक महिला गत 8 मे रोजी आशा यांच्या घरी इतर 3 अनोळखी महिलांना घेऊन आली होती. यावेळी संबंधित अज्ञात महिलांनी प्रभू येशू यांच्या प्रार्थनेने सर्व आजार बरे होतात असा दावा केला. त्यांनी आशा यांना दर रविवारी मालाड पश्चिम येथील शाळेत होणाऱ्या प्रार्थना सभेला येण्याचे निमंत्रण दिले. तक्रारदाराच्या मुलाने केला प्रकरणाचा भांडाफोड आशा उपाध्याय यांना आजार बरे करण्याच्या उषा गुप्ता यांच्या दाव्यावर संशय आला. त्यांनी ही गोष्ट आपला मुलाला सांगितली. त्यानंतर गत 10 मे रोजी त्यांचा मुलगा हा कार्यक्रम पाहण्यासाठी मालाड पश्चिम येथील एका शाळेत गेला. तिथे रमेश गुप्ता नामक व्यक्ती लोकांच्या डोक्यावर हात ठेवून आजार बरे केल्याचे भासवत असल्याची बाब त्याच्या निदर्शनास आली. त्याला ही गोष्ट खटली. त्यामुळे त्याने या घटनेचे चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला रोखण्यात आले. या प्रकारानंतर आशा उपाध्याय यांच्या मुलाने थेट पोलिस नियंत्रण कक्षाकडे या प्रकाराची तक्रार केली. त्यावरून मालाड पोलिसांनी रमेश गुप्ता, उषा गुप्ता, अमन दुबे, मुकेश यादव व 3 अज्ञात महिलांविरोधात अंधश्रद्धा पसरवणे, फसवणूक व धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणी चौघांना अटकही केली. त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात खळबळ नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याच्याशी संबंध असल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग व पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले आहे. सध्या त्यांच्यामागे चौकशीहीचाही ससेमिरा लागला आहे. अशोक खरातशी असणाऱ्या कथित आर्थिक संबंधांमुळे त्यांची ईडी चौकशीही होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed