मृत्यूच्या 3 महिन्यांनंतर वडिलांची स्टॅम्पवर सही:कोट्यवधींच्या मालमत्तेसाठी आई-भावांचे षडयंत्र, बहिणीच्या RTI मुळे फुटले बिंग

0
new-project-2026-05-13t141301196_1778661828.jpg




वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर डल्ला मारण्यासाठी सख्या आईने आणि दोन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची फसवणूक केल्याचे अंबारनाथमध्ये समोर आले आहे. दिवंगत भाजप नेते गुलाबराव करंजुले यांचे मोठे बंधू आनंदराव करंजुले यांच्या नावे असलेल्या मालमत्तेसाठी चक्क त्यांच्या बनावट सह्यांचे मृत्यूपत्र तयार करण्यात आले. मात्र, मृत्यूनंतर तीन महिन्यांनी चलनात आलेल्या स्टॅम्प पेपरचा वापर करण्यात आला होता. माहिती अधिकारातील माहितीनंतर हा सर्व बनाव उघड झाला आहे. अंबरनाथमधील रहिवासी अर्चना आनंदराव करंजुले यांचे वडील आनंदराव यांचे ६ जुलै २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या नावे अंबरनाथ आणि अहमदनगर येथे दुकाने, घरे आणि कोट्यवधींची मालमत्ता आहे. वडिलांच्या निधनानंतर या मालमत्तेचे वारसदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी बँकांकडून पत्रे येत होती. अर्चना यांनी आपले भाऊ प्रशांत आणि संतोष करंजुले यांच्याकडे वारस दाखल्यासाठी विचारणा केली. मात्र, भावांनी त्यांना कोणतीही कल्पना न देता गुपचूप न्यायालयात वारस दाखल्यासाठी अर्ज केला आणि वडिलांनी आपल्याला मालमत्तेतून बेदखल केल्याचे खोटे मृत्यूपत्र सादर केले. ‘तारीख’ चुकली अन् बिंग फुटले! अर्चना यांच्या भावांनी न्यायालयात सादर केलेल्या मृत्यूपत्रावर १२ ऑक्टोबर २०२२ ही तारीख होती. मात्र, अर्चना यांना त्यावरील वडिलांच्या सहीबद्दल संशय आला. त्यांनी खचून न जाता माहिती अधिकारात मुद्रांक कार्यालयातून त्या स्टॅम्प पेपरची कुंडली काढली. तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले; जो स्टॅम्प पेपर १२ ऑक्टोबर २०२२ चा असल्याचे भावांनी दाखवले होते, तो प्रत्यक्षात १६ ऑक्टोबर २०२३ रोजी चलनात आला होता. म्हणजेच, वडिलांच्या मृत्यूनंतर तब्बल ३ महिन्यांनी तो स्टॅम्प पेपर विक्री झाला होता. मृत व्यक्तीने आपल्या निधनानंतर वर्षभरानंतर स्टॅम्पवर सही कशी केली? या एका प्रश्नाने संपूर्ण गुपित उघड केले. राजकीय वलय आणि पोलिसांची ‘मैत्री’ हा बनाव उघड झाल्यानंतर अर्चना तक्रार देण्यासाठी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गेल्या, परंतु राजकीय वलयामुळे पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “आरोपी आमचे मित्र आहेत,” असे धक्कादायक उत्तर पोलिसांनी दिल्याचे अर्चना यांनी सांगितले. अखेर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त (DCP) अतुल झेंडे यांच्या आदेशानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली आणि गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. आई आणि भावांवर गुन्हा दाखल याप्रकरणी पोलिसांनी आई सुनंदा करंजुले, भाऊ प्रशांत आणि संतोष करंजुले, तसेच बनावट मृत्यूपत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणारे अमित जैन आणि प्रदीप सिंग यांच्याविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि कट रचल्याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed