Weather Update | पुढील काही दिवस मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा; ‘या’ राज्यांना हवामान विभागाचा अलर्ट

0
sayali-web-2026-05-07T105743.376-1.webp.webp


Weather Update | भारतीय हवामान विभागाने (IMD) १३ मे २०२६ रोजी देशातील विविध भागांसाठी महत्त्वाचा हवामान इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर आणि ईशान्य भारतात वादळी पावसाचे सावट आहे, तर दुसरीकडे पश्चिम आणि मध्य भारत भीषण उष्णतेने होरपळणार आहे.

महाराष्ट्र आणि पश्चिम भारतात उष्णतेची लाट

वादळ आणि पावसाच्या विरुद्ध परिस्थिती पश्चिम भारतात असून, अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) तडाखा बसणार आहे. राठवाडा आणि विदर्भाच्या (Vidarbha) काही भागांत उष्णतेची लाट कायम राहील. तापमानात सामान्यपेक्षा वाढ झाल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम राजस्थानमध्ये (Rajasthan) दिवस-रात्र तीव्र उष्णता राहील, तर गुजरातमध्येही उष्णतेची लाट जाणवेल. पश्चिम मध्य प्रदेशातही पारा चढलेलाच राहील.

उत्तर आणि पूर्व भारतात तीव्र वादळाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज अनेक राज्यांमध्ये ताशी ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बिहार येथे ताशी ५० ते ६० किमी (झोत ७० किमी/तास) वेगाचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह तीव्र वादळाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख या डोंगराळ प्रदेशात ताशी ६०-७० किमी वेगाने वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या मैदानी राज्यांमध्ये ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची आणि पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड येथेही सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुसळधार पाऊस आणि गारपिटीचे सावट

ईशान्य कडील राज्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार असून डोंगराळ भागात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.आसाम (Assam), मेघालय (Meghalaya), सिक्कीम (Sikkim) आणि पश्चिम बंगालच्या हिमालयीन पट्ट्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश आणि अंदमान-निकोबार या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) तीव्र गारपीट होऊ शकते, ज्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

मान्सूनचे आगमन आणि समुद्री इशारा

मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल होत असून, या आठवड्याच्या अखेरपर्यंत अंदमानच्या समुद्रात मान्सूनचे आगमन होऊ शकते. दक्षिण बंगालच्या उपसागरात ताशी ५५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने मच्छिमारांना मन्नारचे उपसागर (Gulf of Mannar) आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील काही दिवसांत (१४-१८ मे) उत्तर आणि मध्य भारतातील तापमानात ४ ते ६ अंशांनी वाढ होऊन उष्णता अधिक तीव्र होणार असल्याचे आयएमडीने नमूद केले आहे.

News Title: Weather Update IMD Issues Storm And Heavy Rain Alert For May 13

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed