अजित दादा म्हणाले होते आपण पुन्हा एकत्र येणार:आमदार संदीप क्षीरसागरांच्या वक्तव्याची चर्चा; बीडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन आमदारांमध्ये संघर्ष उफाळला

0
730-x-548-new-2026-05-13t152503691_1778666390.jpg




बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये सुरू असलेला वाद आता उघडपणे समोर आला आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत नाराजी व्यक्त केली. आपल्या मतदारसंघातील विकासकामांबाबत आयोजित बैठकीला आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला. एवढेच नव्हे तर या प्रकरणात आपण हक्कभंग दाखल करू शकतो, असेही त्यांनी पत्रात नमूद केल्याने बीडच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या वादानंतर संदीप क्षीरसागर यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर थेट निशाणा साधला. बीडवर प्रेम असल्याचे दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात येथील उद्योग गेवराईकडे वळवले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. बीड एमआयडीसी आणि रेशीम उद्योग यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प जिल्ह्याबाहेर नेले जात असल्याचा दावा करत त्यांनी स्थानिक विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे बीड जिल्ह्यातील विकासकामांवरून राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. संदीप क्षीरसागर यांनी यावेळी अजित पवार यांच्यासोबतच्या काही जुन्या चर्चांचाही उल्लेख केला. विमानतळासाठी मांजरसुंबा परिसराचाही सर्वेक्षणात समावेश करावा, अशी मागणी आपण पूर्वी केली होती, असे त्यांनी सांगितले. तसेच बॅकवॉटर योजनेसाठी विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांना दोन वेळा सभा घ्याव्या लागल्या होत्या, असे सांगत त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामांची आठवण करून दिली. आम्ही अर्ध्या रस्त्यातून किंवा चौकातून पळून जाणारे नाही, असे ठाम शब्दांत सांगत क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विकासकामे असोत किंवा भावनिक प्रश्न, आम्ही सातत्याने जनतेमध्ये राहून काम करत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला काय करायचं आणि काय नाही हे कोणी शिकवण्याची गरज नाही. या मतदारसंघाने आम्हाला दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय घडामोडींवरही संदीप क्षीरसागर यांनी भाष्य केले. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट सध्या चर्चेत आहे. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण भेटलो असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, मला याबद्दल फारशी माहिती नाही, असे संदीप क्षीरसागर म्हणाले. मात्र त्यांनी अजित पवार यांच्यासोबत झालेल्या शेवटच्या भेटीचा उल्लेख करत मोठे विधान केले. दादा म्हणाले होते की, आपण पुन्हा एकत्र येणार अजित दादा मला म्हणाले होते की, आपण पुन्हा एकत्र येणार आहोत. मात्र या विषयावर इतके राजकारण सुरू आहे की मी त्यावर अधिक बोलणार नाही, असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी योग्य तो निर्णय मोठे साहेब आणि त्यांचा परिवार घेतील, असे म्हणत शरद पवार यांच्या भूमिकेकडेही सूचक इशारा केला. बीडमधील स्थानिक राजकारणापासून ते राष्ट्रवादीतील संभाव्य घडामोडींपर्यंत अनेक चर्चांना या वक्तव्यांमुळे पुन्हा उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed