नक्षलवादी हिडमाचे 54 व्हिडिओ युट्यूबवरून हटवणार:महानिरीक्षक संदीप पाटील यांची माहिती, बंदी घातलेल्या संघटनेचा प्रचार गुन्हा
![]()
जहाल नक्षलवादी आणि बंदी घातलेल्या ‘सीपीआय माओवादी’ संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य हिडमा याच्याशी संबंधित 54 गाणी आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवरून हटवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ‘युट्यूब’ला अधिकृत सूचना केल्या आहेत. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी चंद्रपूर येथे माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. 2009 पासून या संघटनेवर देशभरात बंदी असल्याने, त्यांच्याशी संबंधित कोणत्याही साहित्याचा प्रचार करणे हा गुन्हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नुकतेच पुणे आणि गडचिरोलीच्या एटापल्ली येथे लग्नामध्ये हिडमाच्या गाण्यांवर नाचणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. एटापल्लीत पाच युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा कारवाया कुणावरही आकसापोटी नसून, नक्षलवादी संघटनांवर बंदी आहे, ही बाब लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केल्या जात असल्याचे महानिरीक्षक पाटील यांनी सांगितले. हिडमाचा कोणताही मजकूर किंवा गाणी सोशल मीडियावर पसरू नयेत, यासाठी 54 व्हिडिओ काढून टाकण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत आगामी काळात मोठ्या प्रमाणावर नवीन उद्योग येणार आहेत. मात्र, या उद्योगांना धमकावणे, ब्लॅकमेल करणे किंवा खंडणीसाठी त्रास देणाऱ्यांची संख्या वाढल्याचे पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यावर कडक इशारा देताना संदीप पाटील म्हणाले की, उद्योगांच्या विकासात अडथळा आणणाऱ्यांचा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही. दुर्गापूर पोलिसांनी नुकतेच अशा सहा जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली असून, भविष्यातही अशा खंडणीखोरांवर कठोर कारवाई केली जाईल. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मूत्रपिंड (किडनी) विक्री प्रकरणात पोलिसांनी मोठी प्रगती केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामकृष्ण सुंचू याला सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे. मात्र, या रॅकेटमध्ये सहभागी असलेले दिल्लीचे डॉ. रवींद्रपाल सिंग आणि त्रिची येथील डॉ. कृष्णा यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. हे दोन्ही डॉक्टर सध्या फरार असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले आहे, अशी माहितीही पाटील यांनी दिली. याशिवाय, क्षेत्रात अपघातांचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगतानाच, जड वाहतुकीच्या प्रश्नावर पोलिस गांभीर्याने लक्ष देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
