कालव्यातून पाईप ओढताना पाय दोरीत अडकला:तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील घटना
![]()
वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात कालव्यातून पाईप नेतांना हात अन पाय दोरीत अडकल्याने तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गणेशपूर गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात बाभणाजी वाघमारे (38) यांचे शेत आहे. त्यांच्या शेताच्या मधूनच कालवा गेल्याने शेताचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे त्यांना दोन्ही बाजूने असलेल्या शेतीची कामे करावी लागतात. कालव्याच्या पाण्यावर शेती सिंचनासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. एका बाजूच्या शेतात भिजवण झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पाईप नेऊन भिजवण करावे लागले. दरम्यान, त्यांनी शेतात जनावरांसाठी चारा पिक टाकले होते. या पिकाला पाणी देण्यासाठी एका शेतातील पाईप दोरीद्वारे कालव्यातून दुसऱ्या शेतात नेला जात होता. यावेळी कालव्याच्या पाण्यात मोधमध आल्यानंतर त्यांच्या हातात व पायात दोरी अडकली त्यामुळे त्यांना पोहता आले नाही तर कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहासोबत ते वाहून गेले. सदर प्रकार त्यांच्या वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी आरडा ओरड केली मात्र मदती मिळेपर्यंत सुमारे वीस मिनीटापेक्षा अधिक वेळ झाला होता. कालव्याच्या पाण्यातून बाहेर काढून त्यांना वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या प्रकरणी भानुदास वाघमारे यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक कांबळे पुढील तपास करीत आहेत. मयत शेतकरी बाभणाजी वाघमारे यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
