[ads1]
![]()
पुण्यातील मगरपट्टा सिटी भागात एका ज्येष्ठ नागरिकाची ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी 1 कोटी 28 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार 74 वर्षांचे असून, ते हडपसरमधील मगरपट्टा सिटीत राहतात. सायबर चोरट्यांनी 20 ऑगस्ट रोजी तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (CBI) अधिकारी असल्याचे सांगितले. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला सांगितले की, त्यांच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाला आहे. या प्रकरणात त्यांना अटक केली जाईल, अशी धमकीही दिली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले गेले. तक्रारदाराने गेल्या दहा दिवसांत सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 28 लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तांत्रिक तपास सुरू केला आहे. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले, त्यांची माहिती घेतली जात आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देऊन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. सायबर पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांना अशा बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे.
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad