अंजनगाव सुर्जीत बेकायदा वृक्षतोड; वन, महसूल विभागाचे दुर्लक्ष:तस्करांना रान मोकळे, वृक्ष प्राधिकरणही निष्क्रीय भूमिकेत
![]()
अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड सुरू आहे. संबंधित शासकीय अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने वृक्षतोड करणाऱ्या तस्करांना मोकळे रान मिळाले आहे. विविध विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले वृक्ष प्राधिकरणही या प्रकरणात निष्क्रिय भूमिका बजावत असल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील चौसाळा, निमखेड, कोकर्डा, सातेगाव, भंडाराज, धनेगाव, बोराळा, विहिगाव, चिंचोली तसेच अचलपूर तालुक्यातील शिंदी, कोल्हा-काकडा या शिवारांमधून बंगाली बाभळीची अनेक झाडे कापली जात आहेत. कडूनिंब आणि इतर स्थानिक प्रजातींच्या झाडांचीही मोठ्या प्रमाणात कटाई होत आहे. कापलेला माल थेट मालवाहू गाड्यांमधून शहरातील काही आरामशीनवर बिनधास्तपणे नेला जात आहे. महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच वन विभाग आणि पोलीस खात्याचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. कोणतीच कारवाई होत नसल्याने वृक्षतोड करणाऱ्यांचे फावत असून त्यांना कोणाचाही धाक उरलेला नाही. या व्यवसायात शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी असल्याची चर्चा आहे. तस्करांचे काही अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत मधुर संबंध असल्यामुळेच संपूर्ण तालुक्यातून दिवसाढवळ्या वृक्षतोडीचा माल नेला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात महसूल प्रशासन आणि वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध वृक्षतोड करणारे काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर अनेक वेळा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतातील झाडे तोडताना अनेक वेळा शेतकरी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाहून शेतातून पळून जातात. त्यामुळे त्यांचे मनसुबे वाढत चालले आहेत. हे लोक मध्यरात्री झाडांची कटाई करतात आणि सूर्योदय होण्यापूर्वी वृक्षांसह शहरात दाखल होतात, अशी माहिती आहे. यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान, वन विभाग आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागातील आरामशीनवर येणाऱ्या लाकडांच्या मालाची तपासणी मोहीम सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. तालुक्यात सुरू असलेल्या या अवैध वृक्षतोडीबाबत महसूल विभागाने किती कारवाया केल्या, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे. अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदार पुष्पा सोळंके-दाबेराव यांनी सांगितले की, वृक्षतोडीची माहिती मिळाल्यावर परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सोमवारी लेखी पत्र आणि भ्रमणध्वनीवर संदेश देऊन तात्काळ कारवाई करून संबंधित ठिकाणी निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
