संत जनाबाईंनी जागतिक स्त्रीवादाचा पाया घातला- डॉ. सबनीस:'संत जनाबाई- शोध आणि तत्त्वचिंतन' ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात मत व्यक्त

0
9b01c775-02c2-4243-ad7d-100c587bc745_1778597381653.jpg




पुणे: ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संत जनाबाईंना जागतिक स्त्रीवादाचा पाया रचणाऱ्या प्रवर्तक संबोधले आहे. धनंजय होनमाने लिखित ‘संत जनाबाई: शोध आणि तत्त्वचिंतन’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. हा सोहळा पुण्यात पार पडला. डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, संत नामदेव आणि संत जनाबाई यांनी कीर्तन परंपरेला सर्वोच्च स्थानी नेले. संत जनाबाई मातंग समाजाच्या होत्या. त्यांचे तत्त्वज्ञान चैतन्यवादी होते आणि त्यांना स्त्री जन्माचा सार्थ अभिमान होता, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. रंगनाथ पठारे यांनी सांगितले की, संतांनी मानवता धर्म पेरण्याचे काम केले. महाराष्ट्राची भूमी समतेने टिकवून ठेवण्यात संतांचे मोठे योगदान आहे. लोकप्रबोधनाच्या व्यापक कार्यात संत जनाबाईंचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी धनंजय होनमाने यांच्या संशोधनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, होनमाने यांनी संत जनाबाईंच्या चरित्राचा योग्य शोध घेतला आहे. जनाबाई मातंग समाजाच्या असल्याने, त्यांच्या या संशोधनामुळे त्यांच्या अभंगांचा आणि कार्याचा बोध घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल. जनाबाईंनी तत्कालीन समाजव्यवस्थेचा त्रास सहन करूनही धाडसाने समाज प्रबोधनाचे काम केले. हाच खरा विद्रोह त्यांनी अभंगातून व्यक्त केला. ह.भ.प. प्रा. डॉ. सुहास फडतरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतीय समाजव्यवस्थेने स्त्रियांवर अन्याय केला. बुद्ध आणि महावीर यांनी स्त्रियांना सर्वप्रथम न्याय दिला. ‘आम्हा सापडले वर्म कडू भागवत धर्म’ असे सांगत, भागवत धर्म केवळ मानवता धर्म मानतो, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. आशालता कांबळे यांनी सांगितले की, संत जनाबाईंच्या ओव्या सर्वसामान्य महिलांनी जात्यावर गायल्या आणि त्या गावागावात पोहोचल्या. त्यामुळे त्या ग्रामीण भागात अधिक लोकप्रिय होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed