जीएमसी आलियाबादमध्येच होणार, जागेचा तिढा सुटला:डीनला आरक्षण बदलण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

0
ea2a7c67-83d6-40ff-911e-389f7e8857d1_1778597367796.jpg




अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) आता आलियाबाद येथेच उभारले जाणार आहे. या जागेचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला तिढा सुटल्याचे संकेत मिळाले आहेत. शासनाच्या कक्ष अधिकारी प्रियंका कागिनकर यांच्या स्वाक्षरीने अधीष्ठाता (डीन) डॉ. नंदकिशोर राऊत यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रानुसार, जागेचे आरक्षण बदलवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी, जीएमसीसाठी प्रस्तावित असलेली जागा ‘आयडेंटीफाईड फॉरेस्ट’ प्रकारात मोडत असल्याने पर्यायी जागांवर विचार सुरू झाला होता. जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटीचा परिसर आणि नांदगाव पेठ अशा दोन पर्यायी जागा यापूर्वी सुचवण्यात आल्या होत्या. मात्र, शासनाने पाठवलेल्या ताज्या पत्रामुळे आता आलियाबादच्या जागेवरच जीएमसी उभे राहणार हे निश्चित झाले आहे. सदर पत्रानुसार, जागेचे आरक्षण बदलवण्यासाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांचेही सहकार्य प्राप्त होणार आहे. यामुळे पुढील प्रक्रिया सुलभ होण्याची अपेक्षा आहे. जीएमसी अमरावतीचे अधीष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत यांनी सांगितले की, शासनाचे पत्र मंगळवारी दुपारीच प्राप्त झाले आहे. त्यातील निर्देशानुसार, बुधवारपासून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल. जागेचे आरक्षण बदलवण्यासाठी एका त्रयस्थ यंत्रणेची मदत घ्यावी लागणार आहे. यासाठी जाहिरात प्रकाशित करून किमान तीन संस्थांकडून प्रस्ताव मागवले जातील. त्यातील जो प्रस्ताव योग्य असेल, त्याला हे काम दिले जाईल. येत्या आठवडाभरात ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा आपला प्रयत्न असेल, असे डॉ. राऊत यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed