नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड;चार आरोपी जेरबंद; १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नवीन नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहिमेअंतर्गत अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण १ लाख ३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२३/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ च्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई समीर अहमद शब्बीर अहमद यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १० मे रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आदित्य वजन काट्याजवळ, एमआयडीसी परिसरात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपींकडून जुगार साहित्य, रोख रक्कम, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले.
या कारवाईत विलास प्रल्हादराव गजभारे (रा. गोपालचावडी, ता. जि. नांदेड), नारायण बळीराम चिटलेवार (रा. बळीरामपूर, ता. जि. नांदेड), प्रसाद संजय सूर्यवंशी (रा. येळी, ता. लोहा, जि. नांदेड) आणि संदीप धोंडिबा जगदंबे (रा. वाघाळवाडा, जि. नांदेड) यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक ओमकांत चिखलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे तसेच वसंत केंद्रे, मारोती पंचलिंग, शंकर माळोळे, समीर अहमद आणि धर्मपाल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
Post Views: 279
