मॉर्निंग वॉक ट्रॅकजवळ डीपी बसविण्यास नागरिकांचा विरोध
नांदेड (प्रतिनिधि) – शहरातील कॅनॉल रोडपासून जवळच असलेल्या पाटबंधारेनगर भागात जुन्या जागेवर डीपी न बसविता नवीन जागेवर डीपी बसविली जात आहे. सदरील डीपी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करणाऱ्या ट्रॅक जवळच बसविला जात आहे. त्यास नागरिकांचा विरोध असून याबाबत महावितरणला निवेदन देखील सादर करण्यात आले आहे. परंतु संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याने बिनदिक्कतपणे हे काम सुरू आहे.
महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता तोटावार व संबंधित कंत्राटदार यांनी नियमांचे पालन न करता मॉर्निंग वॉक ट्रॅकजवळच हा डीपी बसवत आहेत. विशेष म्हणजे या भागात पूर्वी ज्या ठिकाणी डीपी आहे त्या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी वाढवून सदरील काम करता येते किंवा पूर्वीच्या डीपीच्या जागेवर नवीन डीपी बसविता येते. परंतु केवळ कंत्राटदाराची मर्जी सांभाळण्यासाठी हा प्रकार केला जात आहे, अशी या भागातील नागरिकांना दाट शंका आहे.
ज्या ठिकाणी नवीन डीपी बसविली जात आहे. तो भाग म्हणजे पाटबंधारेनगर भागातील नागरिकांचा मॉर्निंग वॉक ट्रॅक आहे. त्या भागात दररोज शेकडो नागरिक सकाळी व सायंकाळी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करत असतात. तसेच लहान मुलेदेखील त्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत सायंकाळच्या वेळेस खेळत असतात. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या वर्दळीचा तसेच रहदारीचा हा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी डीपीचा स्फोट किंवा स्पार्किंग झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे सदरील जागेवर डीपी बसवू नये , अशी नागरिकांची मागणी आहे.
महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता तोटावार यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी जागा सरकली जाणार नाही, काय करायचे आहे ते करून घ्या. कोणाला सांगायचे आहे ते सांगा अशा प्रकारे अरेरावी व उद्धट भाषा वापरली. तसेच यापूर्वी दोन जागा बदलून या तिसऱ्या जागेची आम्ही निवड केली असे त्यांनी सांगितले. असे असताना त्यांनी पूर्वीच्या दोन जागा कशामुळे बदलल्या? तसेच त्या जागा बदलण्याचा अधिकार आहे का किंवा नवीन जागा निवडत असताना शेजारच्या लोकांची ना हरकत घेतलेली आहे का? याचाही खुलासा महावितरणने करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सध्या बसवीत असलेल्या जागेवर डीपी बसवू नये. अन्य जागेवर डीपी बसवावा किंवा पूर्वीचा डीपी ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी हा डीपी बसवावा. अन्यथा भविष्यात सदरील जागेवर डीपी बसविल्यामुळे काही अघटीत घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण व सहाय्यक अभियंता तोटावार व संबंधित कंत्राटदारावर असेल, असेही शेवटी निवेदनात म्हटले आहे.
Post Views: 30
